Color-Changing Gemstone | हिऱ्याला विसरा... हा आहे सरड्यासारखा रंग बदलणारा खडा!  
विश्वसंचार

Color-Changing Gemstone | हिऱ्याला विसरा... हा आहे सरड्यासारखा रंग बदलणारा खडा!

संपूर्ण जगात फक्त ‘या’ एकाच देशात मिळतो हा खजिना

पुढारी वृत्तसेवा

अंकारा : जेव्हा आपण एखाद्या अत्यंत महागड्या किंवा मौल्यवान वस्तूचा विचार करतो, तेव्हा सर्वात आधी आपल्या डोक्यात हिरा, पाचू किंवा माणिक हीच नावे येतात. परंतु, या जगात असाही एक खडा आहे ज्याच्यापुढे हिऱ्याची चमकही फिकी पडेल. या अनोख्या रत्नाचे नाव आहे ‘सुल्तानत’ (Zultanite / Sultanite). हा कोणताही साधासुधा खडा नसून निसर्गाचा एक जादुई चमत्कार आहे, जो संपूर्ण जगात फक्त आणि फक्त एकाच देशात आढळतो. या रत्नाची सर्वात भारी गोष्ट म्हणजे हा सरड्यासारखा रंग बदलतो. याच्यावर पडणारा प्रकाश बदलला की, याचा रंगही पूर्णपणे बदलतो. हे पाहून कोणीही थक्क होईल. हा अनोखा खडा संपूर्ण जगात केवळ तुर्कीच्या डोंगराळ भागातच दडला आहे. तुर्कीव्यतिरिक्त आजवर जगातील इतर कोणत्याही देशात किंवा कोपऱ्यात हा दगड सापडलेला नाही.

तुर्कीच्या डोंगराळ भागातील ‘इल्मली’ नावाच्या ठिकाणी या रत्नाचे उत्खनन (मायनिंग) केले जाते. हा परिसर समुद्रापासून हजारो फूट उंचीवर आहे, जिथे पोहोचणे हे स्वतःच एक मोठे आव्हान आहे. येथील रस्ता इतका खडकाळ आणि कठीण आहे की, हा दगड शोधून बाहेर काढणे म्हणजे लोखंडाचे चणे चघळण्यासारखे आहे. याच कारणामुळे याची गणना जगातील सर्वात महागड्या रत्नांमध्ये होते. या दगडाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजेच याची ‘यूएसपी’ त्याचा रंग बदलणे हीच आहे. वैज्ञानिक भाषेमध्ये याला ‘कलर चेंज इफेक्ट’ म्हणतात. सोप्या शब्दांत सांगायचे तर, जर तुम्ही याला दिवसाच्या प्रकाशात किंवा उन्हात पाहिले, तर हा तुम्हाला हुबेहूब किवी फळासारखा हिरवा दिसेल.

परंतु, जसे तुम्ही याला घेऊन एखाद्या खोलीच्या आत याल किंवा मेणबत्तीच्या प्रकाशात पाहाल, तसा याचा रंग अचानक बदलून गुलाबी किंवा हलका तपकिरी (ब्राऊन) होतो. हा बदल इतक्या वेगाने होतो की, पहिल्यांदा पाहणाऱ्या व्यक्तीला वाटेल की कोणीतरी मस्करी करून खडा बदलला आहे. रत्नतज्ज्ञ आणि शास्त्रज्ञांच्या मते, हा दगड हिऱ्यापेक्षा कुठेतरी अधिक दुर्मीळ आहे. एका अंदाजानुसार, हा सामान्य हिऱ्यापेक्षा तब्बल १०,००० (दहा हजार) पटीने जास्त प्रयासाने मिळतो. म्हणजेच बाजारात तुम्हाला हिरा सहज मिळेल, पण ‘सुल्तानत’ मिळवणे कठीण आहे. हा खडा महाग असण्याचे आणखी एक मोठे कारण म्हणजे, जेव्हा खाणीतून हा बाहेर काढला जातो, तेव्हा त्याचे कटिंग करताना आणि त्याला पैलू पाडताना त्याचा ९० टक्के भाग तुटून वाया जातो. केवळ १० टक्के भागच शास्त्रोक्त पद्धतीने हातात उरतो, ज्यापासून अंगठी किंवा लॉकेट बनवले जाऊ शकते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT