Hawaiian Islands | हवाई बेटांवर पुन्हा उभे राहिले जंगल 
विश्वसंचार

Hawaiian Islands | हवाई बेटांवर पुन्हा उभे राहिले जंगल

पुढारी वृत्तसेवा

वॉशिंग्टन : अमेरिकेच्या हवाई बेटांवर २० व्या शतकाच्या अखेरीस पर्यावरण संरक्षणकर्त्यांच्या समोर एक मोठे आव्हान उभे राहिले, जेव्हा हजारो एकर जंगल जमिनीचे रूपांतर गवताळ मैदानात झाले. हवाईच्या ‘बिग आयलंड’वरील हकालाऊ फॉरेस्ट वाईल्डलाईफ रिफ्यूज भागातील जमीन दिवसेंदिवस गवताळ मैदानात बदलत चालली होती. यावर उपाय म्हणून १९९० च्या दशकात पर्यावरणप्रेमींनी हे जंगल पुन्हा उभे करण्याचा (पुनरुज्जीवित करण्याचा) निर्णय घेतला. आता या ठिकाणी पुन्हा जंगल निर्माण झाले असून, तिथे पशुपक्ष्यांचा अधिवासही झाला आहे.

१९९२ मध्ये जंगल पुन्हा वसवण्यासाठी एक-एक झाड लावण्यास सुरुवात झाली. पुढील ५ वर्षांत ‘अमेरिकन फॉरेस्टस्‌’ विभागाने या गवताळ प्रदेशात तब्बल १,५०,६५० स्थानिक ‘कोआ’ (Koa) झाडे लावली. या झाडांचा उद्देश फक्त जमीन हिरवीगार करणे एवढाच नव्हता, तर हवाईमधील काही अत्यंत दुर्मीळ पक्ष्यांना अधिवास (राहण्याची जागा) आणि घरटी बांधण्यासाठी सुरक्षित जागा उपलब्ध करून देणे हा होता. तब्बल दोन दशकांनंतर या मोहिमेचे थक्क करणारे परिणाम संशोधकांच्या समोर आले आहेत. संशोधकांच्या पाहणीत असे दिसून आले की, या नव्या वसलेल्या जंगलात पक्षी पुन्हा परत येऊ लागले आहेत.

जशी जशी झाडे मोठी झाली, तसतशा पक्ष्यांच्या अनेक प्रजाती येथे आश्रयाला आल्या. २० वर्षांहून अधिक काळाच्या अभ्यासानंतर तयार करण्यात आलेल्या अहवालात, हकालाऊ प्रोजेक्टला हवाईमधील जंगल पुनरुज्जीवनाचा सर्वात मोठा आणि यशस्वी प्रयत्न मानले गेले आहे. ‘कोआ’ हे हवाईमधील एक स्थानिक झाड आहे, ज्याला जंगलातील ‘कीस्टोन प्रजाती’ (Keystone Species - संपूर्ण परिसंस्थेला आधार देणारी प्रजाती) मानले जाते. कोआ झाड निकृष्ट किंवा खराब झालेल्या जमिनीवरही अत्यंत वेगाने वाढू शकते, म्हणूनच जंगल उभारण्यासाठी या झाडाची निवड करण्यात आली होती. हे निष्कर्ष अत्यंत महत्त्वाचे आहेत, कारण हवाईने आपल्या मूळ जंगलाचा मोठा भाग गमावला आहे, ज्यामुळे तेथील पक्ष्यांच्या अस्तित्वावर मोठा धोका निर्माण झाला होता. विशेष म्हणजे हवाईमधील अनेक पक्षी जगातील इतर कोणत्याही कोपऱ्यात आढळत नाहीत. हकालाऊच्या या अभ्यासावरून हे सिद्ध झाले की, पुन्हा जंगल उभे केल्याने पक्ष्यांना त्यांचा हरवलेला अधिवास परत मिळवून दिला जाऊ शकतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT