विश्वसंचार

ब्राझीलमध्ये फ्लाईंग टॅक्सीचे प्रदर्शन

Arun Patil

साओ पावलो : ब्राझीलियन विमान कंपनी एम्बररने आपण इलेक्ट्रिक फ्लाईंग टॅक्सीची निर्मिती करण्यासाठी साओ पावलो येथे नवा प्रकल्प उभा करत असल्याचे जाहीर केले असून, नव्या फ्लाईंग टॅक्सी 2026 पर्यंत उपलब्ध होऊ शकतील, असे म्हटले आहे. या कंपनीने भविष्यातील आपली इलेक्ट्रिक टॅक्सी कशी असेल, हे दर्शवण्यासाठी त्याचे एक मॉडेल तयार केले आहे.

इलेक्ट्रिक व्हर्टिकल टेक ऑफ अँड लँडिंग एअरक्राफ्ट असे या छोट्या वाहनाचे नाव निश्चित केले गेले असून, त्याला इव्हीटोल या नावाने ओळखले जाणार आहे. साओ पावलोमधील ट्यूबेट शहरात हा प्रकल्प उभारला जाणार आहे. ब्राझीलियन विमान क्षेत्रातील दिग्गज अल्बर्टो सॅन्टोस ड्युमोंट यांच्या 150 व्या जयंतीच्या निमित्ताने ही घोषणा करण्यात आली.

ड्रोनच्या धर्तीवर छोट्या हेलिकॉप्टरप्रमाणे असणार्‍या या टॅक्सीसाठी प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक ट्रीपसाठी 50 ते 100 डॉलर्सचा खर्च येऊ शकतो, असे कंपनीच्या सूत्रांनी सांगितले. प्रारंभी यात पायलट असेल; पण नंतर स्वयंचलित वाहनाची सुविधा या कंपनीतर्फे उपलब्ध करून दिली जाणार आहे. प्रत्येक इव्हीटोलमध्ये एका वेळी 4 ते 6 प्रवाशांना सामावून घेण्याची क्षमता असणार आहे.

सध्या या कंपनीला विविध देशांमधून 2850 इव्हीटोलची ऑर्डर मिळाली असून हेलिकॉप्टर ऑपरेटर्स, एअरलाईन्स व फ्लाईट-शेअरिंग प्लॅटफॉर्मनी त्यात विशेष स्वारस्य दाखवले आहे. इव्ह एअर मोबिलिटी या नावाने सदर कंपनी समभाग न्यूयॉर्क स्टॉक एक्स्चेंजवर उपलब्ध आहेत. मात्र, इव्हीटोलशी संबंधित संशोधन व विकास प्रकल्पावर बराच खर्च होत असल्याने कंपनी 2023 मधील पहिल्या तिमाहीत नुकसानीत असल्याचे यावेळी सांगण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT