वॉशिंग्टन : भविष्यातील अत्यंत वेगवान ‘६जी’ नेटवर्क तंत्रज्ञानाच्या मार्गातील एक सर्वात मोठा अडथळा दूर करण्यासाठी वैज्ञानिकांनी एक अनोखा आणि स्वस्त उपाय शोधून काढला आहे. ‘वाहत्या प्रवाहाच्या’ डिझाईनपासून प्रेरणा घेऊन तयार केलेल्या खास वॉल टाईल्समुळे ‘६ जी’च्या सिग्नलची समस्या कायमची संपुष्टात येऊ शकते, असा दावा एका अहवालात करण्यात आला आहे.
‘५ जी’पेक्षा कित्येक पटीने वेगवान असलेल्या ‘६ जी’ नेटवर्कसाठी अति-उच्च वारंवारता असणाऱ्या ‘टेराहर्टझ्’ (THz) लहरींचा वापर केला जातो. मात्र, या टेराहर्टझ् लहरींची एक मुख्य मर्यादा अशी आहे की, त्या भिंती, दरवाजे किंवा साध्या अडथळ्यांना भेदून पार जाऊ शकत नाहीत. एवढेच नाही तर, बंद खोलीत किंवा इमारतींमध्ये या लहरी सहजासहजी वळू शकत नसल्यामुळे सिग्नल लगेच खंडित होतो किंवा त्याचा वेग कमालीचा घसरतो. या समस्येवर मात करण्यासाठी संशोधकांनी निसर्गातील ‘वाहत्या पाण्याच्या प्रवाहाचा’ अभ्यास केला. ज्याप्रमाणे पाण्याचा प्रवाह खडकांना वळसा घालून स्वतःचा मार्ग मोकळा करतो, त्याच तत्त्वावर आधारित या विशेष टाईल्स तयार करण्यात आल्या आहेत.
या टाईल्स भिंतींवर बसवल्यानंतर, त्या अवकाशात पसरणाऱ्या ‘६ जी’च्या टेराहर्टझ् लहरींना शोषून न घेता किंवा नष्ट न होऊ देता योग्य दिशेने परावर्तित करतात. जिथे थेट सिग्नल पोहोचू शकत नाही (उदा. खोलीचे कोपरे किंवा भिंतीमागील भाग), तिथे या टाईल्स एखाद्या आरशाप्रमाणे काम करतात आणि सिग्नलला वळवून आवश्यक त्या ठिकाणी पोहोचवतात. ‘६जी’च्या प्रसारणासाठी अत्यंत महागडे सिग्नल बूस्टर्स किंवा जटिल अँटेना सिस्टीम बसवण्यापेक्षा, या साध्या आणि स्वस्त वॉल टाईल्स वापरणे अत्यंत किफायतशीर ठरणार आहे. इमारतींच्या आत, कार्यालयांमध्ये किंवा घरांच्या भिंतींवर या टाईल्सचा वापर करून कोणत्याही अडथळ्याविना अखंड आणि उच्च वेगाचे ‘६ जी’ इंटरनेट मिळवणे शक्य होणार आहे. वैज्ञानिकांच्या या शोधामुळे आगामी काळात ‘६ जी’ तंत्रज्ञानाचा विस्तार करणे आणि ते सामान्य माणसांपर्यंत पोहोचवणे अधिक सोपे होणार आहे.