श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये श्रीनगरच्या जबरवन पर्वतराजीच्या कुशीत असलेल्या प्रसिद्ध दल सरोवरात आता नवी 'शिकारा अॅम्ब्युलन्स' लोकांचे लक्ष वेधून घेत आहे. दल सरोवरातच राहणार्या तारिक अहमद पतलू या 46 वर्षांच्या काश्मिरी गृहस्थाने ही अॅम्ब्युलन्स विकसित केली आहे. कोरोना संक्रमणाच्या काळात समोर आलेल्या अनेक अडचणी लक्षात घेऊन त्यांनी हा उपक्रम केला. दल सरोवर केवळ पर्यटकांना आकर्षित करणारे ठिकाण आहे असे नाही. हे सरोवर 1500 पेक्षाही अधिक शिकारे व सहाशेपेक्षाही अधिक हाऊसबोटींचे घर आहे. या सरोवराच्या पाण्यावर राहणारी लोकसंख्या मोठी आहे. मात्र, या लोकांना कुणी आजारी पडले तर अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. त्यांना रुग्णाला शिकार्यात घेऊन काठावर यावे लागते. त्यामुळे तत्काळ मदत मिळण्यास विलंब होतो. कोरोना काळात तर अशा मदतीची बरीच उणीव भासत असल्याने तारिक यांनी अशी अॅम्ब्युलन्स बनवण्याचे ठरवले. ते स्वतः कोरोना संक्रमित झाले होते आणि सुरुवातीला आपल्या हाऊसबोटीतच आयसोलेशनमध्ये होते. मात्र, प्रकृती बिघडल्याने त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागले. बरे होऊन परत जात असताना काठावरील शिकारेवाल्यांनी त्यांना हाऊसबोटीपर्यंत नेण्यास नकार दिला. बर्याच अडचणींना तोंड देत त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना दल सरोवरातील त्यांच्या हाऊसबोटीपर्यंत नेले. हे लक्षात घेऊन त्यांनी ही तरंगती अॅम्ब्युलन्स तयार केली आहे.