First steam powered elevator | वाफेच्या इंजिनवर चालायची जगातील पहिली लिफ्ट! 
विश्वसंचार

First steam powered elevator | वाफेच्या इंजिनवर चालायची जगातील पहिली लिफ्ट!

पुढारी वृत्तसेवा

न्यूयॉर्क : आजच्या काळात गगनचुंबी इमारतींच्या गर्दीत लिफ्ट हा आपल्या जीवनाचा एक सामान्य भाग बनला आहे. पण तुम्ही कधी विचार केला आहे का, की पहिल्यांदा जेव्हा एखादी लिफ्ट चालली असेल, तेव्हा ती कशी दिसत असेल? जगातील पहिल्या व्यावसायिक लिफ्टची कथा ही तांत्रिक कौशल्य आणि धैर्याची कथा आहे. चला जाणून घेऊया जगातील पहिली कमर्शियल लिफ्ट कधी आणि कशी बनली.

23 मार्च 1857 रोजी अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात इतिहास रचला गेला. येथील ब—ॉडवे स्थित ‘ई.व्ही. हॉगवॉट डिपार्टमेंट स्टोअर’मध्ये जगातील पहिल्या प्रवासी लिफ्टची सुरुवात झाली. त्यावेळी ही लिफ्ट तयार करण्यासाठी सुमारे 2,500 डॉलर खर्च आला होता. हे केवळ एक मशिन नव्हते, तर शहरी जीवनाचे भविष्य बदलून टाकणारी एक क्रांतिकारी सुरुवात होती. आजच्या लिफ्ट विजेवर चालतात; परंतु 1857 मधील ती पहिली व्यावसायिक लिफ्ट वाफेवर चालणार्‍या इंजिनद्वारे चालविली जात असे. हे अवाढव्य इंजिन इमारतीच्या तळघरात बसवण्यात आले होते.

तांत्रिक वैशिष्ट्याबद्दल बोलायचे झाले, तर ही लिफ्ट दर मिनिटाला सुमारे 40 फूट वेगाने वर-खाली जात असे. आजच्या तुलनेत हा वेग कमी वाटत असला, तरी त्या काळासाठी हा एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नव्हता. त्याकाळी लोकांच्या मनात सर्वात मोठी भीती ही होती की, जर लिफ्टची केबल तुटली तर काय होईल? ही भीती घालवण्यासाठी त्यामध्ये एक विशेष ‘रॅचेट सेफ्टी लॉक’ बसवण्यात आला होता. या तंत्रज्ञानाचे वैशिष्ट्य असे होते की, जर काही कारणास्तव लिफ्टची केबल तुटलीच, तर हा सुरक्षा लॉक त्वरित सक्रिय व्हायचा आणि लिफ्टला त्याच जागी थांबवून धरायचा.

या सुरक्षा यंत्रणेने लोकांना उंचावर जाण्यासाठी मानसिकद़ृष्ट्या तयार केले आणि लिफ्ट कोसळण्याचा धोका पूर्णपणे संपवला. या सुरक्षित लिफ्टच्या आगमनापूर्वी इमारतींची उंची मर्यादित असायची. कारण पायर्‍यांनी खूप वर जाणे थकवणारे आणि कठीण काम होते. परंतु, या शोधामुळे भविष्यातील उंच इमारती आणि गगनचुंबी इमारतींच्या निर्मितीचा मार्ग मोकळा झाला. यानंतर वरच्या मजल्यांवर जाणे सोपे आणि सुरक्षित झाले, ज्याने शहरांची रूपरेखाच बदलून टाकली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT