वॉर्सा : पोलंडचा गिर्यारोहक आणि स्कीअर आंद्रेज बार्गिल याने ऑक्सिजन सिलिंडरचा वापर न करता जगातील सर्वोच्च शिखर माऊंट एव्हरेस्टवरून स्कीईंग करत खाली उतरण्याचा ऐतिहासिक पराक्रम केला आहे. गुरुवारी, 25 सप्टेंबर 2025 रोजी त्याच्या टीमने याबाबतची घोषणा केली.
8,849 मीटर उंचीच्या एव्हरेस्ट शिखरावर बार्गिलचा चढाईचा प्रवास अपेक्षित वेळेपेक्षा जास्त झाला, याचे कारण होते जोरदार हिमवर्षाव. बार्गिलने 8,000 मीटरपेक्षा जास्त उंचीवर असलेल्या ‘डेथ झोन’मध्ये पूरक ऑक्सिजनचा (सप्लिमेंटल ऑक्सिजन) वापर न करता 16 तास काढले. शिखरावर पोहोचल्यानंतर त्याने काही मिनिटांतच स्की लावले आणि मावळत्या सूर्याशी सलाम करत आपल्या ऐतिहासिक उतरणीला सुरुवात केली.
बार्गिलच्या टीमने दिलेल्या माहितीनुसार, अंधारामुळे सुरक्षितपणे मार्गक्रमण करणे शक्य नसल्याने बार्गिलला सुमारे 6,400 मीटर उंचीवर असलेल्या कॅम्प 2 वर थांबावे लागले. सूर्योदयानंतर त्याने पुन्हा खाली उतरण्यास सुरुवात केली.
पोलंडचे पंतप्रधान डोनाल्ड टस्क यांनी आपल्या ‘एक्स’ अकाऊंटवर बार्गिलच्या पराक्रमाचे कौतुक करताना लिहिले, आकाश मर्यादा आहे? पोलिश लोकांसाठी नाही! आंद्रेज बार्गिलने नुकतेच माऊंट एव्हरेस्टवरून स्कीईंग केले! बार्गिलने 37 व्या वर्षी हा पराक्रम केला आहे. यापूर्वी, 2018 मध्ये जगातील दुसरे सर्वात उंच शिखर के2 (K2) वरून स्कीईंग करणारा तो पहिला व्यक्ती ठरला होता. पोलंडच्या गिर्यारोहकांनी 1980 च्या दशकात हिवाळी मोहिमांमुळे मिळवलेली धाडसी परंपरा बार्गिलने कायम ठेवली आहे.