सिसिली : समुद्राच्या पोटात दडलेल्या रहस्यांचा शोध घेणाऱ्या संशोधक आणि डायव्हर्सना (पाणबुडे) भूमध्य समुद्रात एक मोठा आणि ऐतिहासिक शोध लागला आहे. या भागात पहिल्यांदाच एका महाकाय ‘ग्रेट व्हाईट शार्क’ला पाण्याखाली पोहताना पाहण्यात आले असून त्याचे दुर्मीळ फुटेजही कॅमेऱ्यात कैद करण्यात आले आहे. ‘हेल्दी सीज’ या संस्थेचे डायव्हर्स सिसिली आणि ट्युनिशियाच्या दरम्यान समुद्रात बुडालेल्या एका जहाजाच्या अवशेषांमधून ‘भूत जाळी’ (घोस्ट नेटस्- समुद्रात टाकून दिलेली घातक जाळी) काढण्याचे काम करत होते. हे काम करत असतानाच अचानक त्यांच्यासमोर हा महाकाय शिकारी आला. भूमध्य समुद्रातील नैसर्गिक अधिवासात एखाद्या पूर्ण वाढ झालेल्या ‘ग्रेट व्हाईट शार्क’चा व्हिडीओ कॅमेऱ्यात कैद होण्याची ही जगातील पहिलीच वेळ मानली जात आहे.
लॉटरी लागण्यापेक्षाही दुर्मीळ क्षण:
हा थरारक क्षण कॅमेऱ्यात कैद करणारे डायव्हर डर्क रेमर्स म्हणाले, ‘सांख्यिकीयदृष्ट्या पाहायला गेले, तर समुद्राखाली अशा आयकॉनिक प्राण्याला समोरासमोर पाहण्यापेक्षा लॉटरीचे जॅकपॉट जिंकणे जास्त सोपे आहे. तुम्ही अनेक दशके जहाजांचे अवशेष शोधण्यात आणि जाळी काढण्यात घालवता, पण अशा क्षणासाठी तुम्ही कधीच तयार नसता."
युरोपच्या समुद्रात शार्कचा वावर
सामान्यतः 'ग्रेट व्हाईट शार्क' हे पॅसिफिक महासागर, दक्षिण आफ्रिका आणि ओशनियाच्या समशीतोष्ण आणि उष्णकटिबंधीय किनारपट्टीच्या भागात आढळतात; परंतु या ताज्या शोधामुळे हे हिंस्र प्राणी आता युरोपच्या किनारपट्टीवर आणि भूमध्य समुद्रातही फिरत असल्याचे स्पष्ट झाले आहे. शार्कची ही उपस्थिती समुद्रातील अन्नसाखळी आणि पर्यावरण संतुलित राखण्यासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते.