Antarctica Dinosaur Fossil | अंटार्क्टिकात आढळलेले पहिले डायनासोर जीवाश्म अवाढव्य प्रजातीचे 
विश्वसंचार

Antarctica Dinosaur Fossil | अंटार्क्टिकात आढळलेले पहिले डायनासोर जीवाश्म अवाढव्य प्रजातीचे

पुढारी वृत्तसेवा

लंडन: बर्फाच्छादित अंटार्क्टिका खंडात सर्वात आधी सापडलेले डायनासोर जीवाश्म हे पृथ्वीवर आतापर्यंत अस्तित्वात असलेल्या सर्वात अवाढव्य प्राण्यांच्या समूहातील डायनासोरचे होते, असा महत्त्वपूर्ण खुलासा एका नवीन संशोधनातून झाला आहे.

सुमारे ८ कोटी २० लाख वर्षांपूर्वीच्या या अवाढव्य प्राण्याच्या पाठीचा कणा ४० वर्षांपूर्वीच शोधण्यात आला होता. परंतु, त्यावेळी संशोधकांनी तो एका प्राचीन सागरी सरपटणाऱ्या प्राण्याचा असावा, असा अंदाज लावला होता. आता ‘एक्टा पॅलिओन्टोलॉजिकल पोलोनिका’ या जर्नलमध्ये २९ जून रोजी प्रसिद्ध झालेल्या एका नवीन अभ्यासातून समोर आले आहे की, हा जीवाश्म प्रत्यक्षात एका ‘टायटॅनोसॉर’चा होता. टायटॅनोसॉर हा लांब मान असलेल्या ‘सोरोपॉडस्‌’ डायनासोरचा असा समूह आहे, ज्यामध्ये पृथ्वीच्या पाठीवर चालणाऱ्या इतिहासातील सर्वात मोठ्या प्राण्यांचा समावेश होतो.

लंडनच्या नॅचरल हिस्टरी म्युझियममधील जीवाश्मशास्त्रज्ञ आणि या संशोधनाचे मुख्य लेखक पॉल बॅरेट यांनी एका निवेदनात सांगितले की, ‘पहिल्या नजरेत हे जीवाश्म अगदी सामान्य वाटते. परंतु, अंटार्क्टिकाच्या शोध मोहिमेच्या इतिहासात याला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे; कारण या खंडात सापडलेला हे सर्वात पहिले डायनासोर जीवाश्म आहे.’ जरी हे जीवाश्म अंटार्क्टिकावर सापडलेला पहिला डायनासोर ठरला असला, तरी याचा शोध लागल्यानंतर खंडावर इतरही अनेक डायनासोरचे जीवाश्म ओळखले गेले आहेत. त्यामुळे अंटार्क्टिकावर आढळलेला हा एकमेव डायनासोर नाही.

खरं तर, संशोधकांनी अंटार्क्टिकावर विविध प्रकारच्या डायनासोरचा शोध लावला आहे, ज्यामध्ये २०११ मध्ये आणखी एका सोरोपॉड जीवाश्माची ‘टायटॅनोसॉर' म्हणूनच ओळख पटली होती. नवीन संशोधनात ओळख पटलेला हा डायनासोर साधारणपणे २० ते २३ फूट (६ ते ७ मीटर) लांब होता. जगातील सर्वात मोठ्या ज्ञात टायटॅनोसॉरच्या तुलनेत हा आकार अतिशय लहान आहे. कारण, मोठे टायटॅनोसॉर तब्बल १२३ फुटांपर्यंत (३७.५ मीटर) वाढू शकत होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT