लंडन : जग वेगाने आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या (एआय) चा वेगवेगळ्या क्षेत्रात आधार घेत वाटचाल करत आहे आणि आता राजकारणातही त्याचा वापर पाहायला मिळत आहे. युरोपमधील लहान देश असलेल्या अल्बानियाने नुकतीच एक अनोखी घोषणा केली आहे. येथील पंतप्रधान एडी रामा यांनी आपल्या नवीन मंत्रिमंडळात एका अशा मंत्र्याचा समावेश केला आहे, जो माणूस नाही तर पूर्णपणे डिजिटल आहे. या ‘एआय’ आधारीत स्त्रीरुपातील मंत्र्याचे नाव ‘डियाला’ आहे, ज्याचा अल्बेनियन भाषेत अर्थ ‘सूर्य‘ असा होतो.
‘डियाला’ हा काही नवीन चेहरा नाही. जानेवारी 2025 पासून ती अल्बानियाच्या सरकारी ऑनलाईन पोर्टल ‘ई-अल्बानिया’ (e-Albania) वर नागरिकांना मदत करत आहे. इथे ती जवळपास 95% सरकारी सेवांची प्रक्रिया सोपी करण्यासाठी मार्गदर्शन करते. लोक व्हॉईस कमांड देऊन कागदपत्रे, अर्ज आणि इतर सरकारी कामांसाठी ‘डियाला’ची मदत घेत आहेत. आता पंतप्रधान रामा यांनी तिला एक मोठी जबाबदारी देऊन मंत्रिमंडळात सामील केले आहे.
पंतप्रधान रामा यांनी घोषित केले की, ‘डियाला’ आता सार्वजनिक खरेदी (सरकारी निविदा आणि कंत्राटे) हाताळेल. याचे मुख्य उद्दिष्ट भ्रष्टाचार संपवणे आणि कामामध्ये पूर्ण पारदर्शकता आणणे हे आहे. अल्बानियामध्ये सरकारी निविदांमधील गैरव्यवहार आणि राजकीय फायद्याच्या तक्रारी नेहमीच येत असतात. त्यामुळे अल्बानिया बराच काळ भ्रष्टाचार आणि लाचखोरीच्या प्रकरणांमुळे चर्चेत आहे. रामा यांचे म्हणणे आहे की, आता सरकारी कंत्राटे आणि निविदांची तपासणी आणि मंजुरी माणसांऐवजी ‘एआय’ करेल. याचा अर्थ, कोणत्या कंपनीला कंत्राट मिळेल, याचा निर्णय ‘डियाला’ घेईल. हा निर्णय पूर्णपणे योग्यतेच्या आणि उपलब्ध माहितीच्या आधारावर असेल, कोणत्याही राजकीय दबावावर नाही.
रामा यांच्या सलग चौथ्या सरकारमध्ये ही घोषणा करण्यात आली आहे. त्यांनी सांगितले की, ‘डियाला आपल्या मंत्रिमंडळाची पहिली सदस्य आहे, जी प्रत्यक्ष नाही; परंतु व्हर्चुअली (virtually) सर्वत्र आहे. त्यांनी ‘डियाला’ला ‘सरकारी कंत्राटांची सेवक’ असे म्हटले आहे. ‘ई-अल्बानिया’ पोर्टलवर ‘डियाला’ पारंपरिक अल्बेनियन पोशाख घातलेली दिसते, जी लोकांना तंत्रज्ञानासोबतच त्यांच्या संस्कृतीचीही झलक देते.
हे एक अत्यंत महत्त्वाकांक्षी पाऊल आहे. प्रश्न असा आहे की, एल्गोरिदम आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स खरोखरच त्या भ्रष्टाचाराला संपवू शकतील का, ज्याच्या विरोधात अनेक एजन्सी आणि सुधारकही संघर्ष करत आहेत? तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, जर हा प्रयोग यशस्वी झाला, तर हे मॉडेल इतर देशांसाठीही प्रेरणा बनू शकते. पण, जर प्रणालीमध्ये काही त्रुटी राहिल्या, तर हा एक दिखावा (flashy experiment) ठरण्याची शक्यता आहे.