Origin of bats | पहिल्या वटवाघळांचा उगम युरोपमधून झाला! 
विश्वसंचार

Origin of bats | पहिल्या वटवाघळांचा उगम युरोपमधून झाला!

पुढारी वृत्तसेवा

वॉशिंग्टन : वटवाघळांच्या उत्क्रांतीबाबत गेल्या अनेक दशकांपासून सुरू असलेल्या वादावर अखेर वैज्ञानिकांनी पडदा टाकला आहे. वटवाघळांनी पक्ष्यांसारखे हवेत उडणे आणि आवाजाच्या लहरींद्वारे संवाद साधणे कधी सुरू केले, यासारख्या अनेक महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे एका ऐतिहासिक अभ्यासातून समोर आली आहेत. या अभ्यासानुसार वटवाघळांची उत्पत्ती युरोपमध्ये झाली होती!

बुधवारी (२३ सप्टेंबर) प्रसिद्ध वैज्ञानिक मासिक ‘नेचर’मध्ये प्रकाशित झालेला हा अभ्यास, वटवाघळांचे डीएनए आणि जीवाश्मांचा आतापर्यंतचा जगातील सर्वात मोठा अभ्यास मानला जात आहे. यामध्ये संशोधकांनी वटवाघळांच्या ४१ प्रजातींचे नवीन आणि उच्च दर्जाचे जीनोम तयार केले. याआधी उपलब्ध असलेल्या ६२ सीक्वेन्ससह एकंदर १०३ वटवाघळांचे जीनोम आणि ४४ जीवाश्मांचा डेटासेट एकत्र करून हे संशोधन करण्यात आले आहे. युनिव्हर्सिटी कॉलेज डब्लिन येथील मॉलिक्युलर इव्होल्यूशनच्या प्राध्यापिका आणि या अभ्यासाच्या सह-लेखिका एमा टीलिंग यांनी सांगितले, ‘हा शोध अत्यंत असाधारण आहे. अनेक दशकांचे संशोधन आणि परस्परविरोधी निष्कर्षांनंतर अखेर वटवाघळांची उत्क्रांती कधी आणि कशी झाली, याचा उलगडा झाला आहे.’

या संशोधनातील विश्लेषणानुसार, वटवाघळांची उत्पत्ती सुमारे ६.५ कोटी वर्षांपूर्वी युरोपमध्ये झाली होती. यापूर्वी वैज्ञानिकांचा असा समज होता की वटवाघळांचा उगम ५ कोटी वर्षांपूर्वी आशिया, आफ्रिका किंवा उत्तर अमेरिकेत झाला असावा; परंतु या नव्या अभ्यासाने तो समज चुकीचा ठरवला आहे. तसेच, वटवाघळांमध्ये ‘इकोलोकेशन’ (आवाजाच्या प्रतिध्वनीद्वारे मार्ग शोधण्याची क्षमता) आणि ‘खरे उड्डाण’ एकाच वेळी सुमारे ५ कोटी वर्षांपूर्वीच विकसित झाले होते, असाही निष्कर्ष संशोधकांनी काढला आहे. युकेमधील युनिव्हर्सिटी ऑफ सेंट अँड्र्यूज येथील न्यूरोजेनेटिक्स ऑफ व्होकल कम्युनिकेशन रिसर्च ग्रुपच्या प्रमुख आणि अभ्यास सह-लेखिका सोनिया वर्नेस म्हणाल्या, ‘या अभ्यासाने वटवाघळांच्या उत्क्रांतीच्या संशोधनाला एक नवीन दिशा दिली आहे.

वैज्ञानिक गेल्या अनेक दशकांपासून ज्या अचूक कौटुंबिक वृक्षाचा शोध घेत होते, तो आता मिळाला आहे. एकदा हा वृक्ष योग्य समजला की, वटवाघळांबद्दलच्या इतर सर्व गोष्टी आपोआप स्पष्ट होतात.’ या अभ्यासात जगात ओळखल्या गेलेल्या वटवाघळांच्या सर्व २१ कुळांतील सदस्यांचा आणि काही अत्यंत दुर्मीळ प्रजातींचा समावेश होता. ‘Bat1K’ या आंतरराष्ट्रीय प्रकल्पाशी जोडलेल्या १३७ वैज्ञानिकांच्या पथकाने अत्याधुनिक डीएनए सीक्वेन्सिंग आणि कम्प्युटेशनल तंत्रज्ञानाचा वापर करून वटवाघळांचा हा नवा कौटुंबिक वृक्ष (Family Tree) तयार केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT