लंडन ः बि—टनमध्ये एका वैद्यकीय चमत्काराची नोंद झाली आहे. तिथे पहिल्यांदाच यूटेरस ट्रान्सप्लांट म्हणजेच गर्भाशय प्रत्यारोपणानंतर एका गोंडस बाळाचा जन्म झाला. हे बाळ म्हणजे विज्ञानाच्या 25 वर्षांच्या मेहनतीचं फलित आहे. एमी इसाबेल डेविडसन असं या बाळाचं नाव आहे.
बाळाची आई, ग्रेस डेविडसन (36 वर्षांची), यांना त्यांच्या मोठ्या बहिणीने, एमी पर्डी (42 वर्षांची), आपले गर्भाशय दान दिले. 2023 मध्ये बि—टनमध्ये पहिल्यांदा यशस्वी यूटेरस ट्रान्सप्लांट सर्जरी झाली आणि ती ग्रेसवरच झाली. हे गर्भाशय दान म्हणजे केवळ वैद्यकीय कृती नव्हती, तर दोन बहिणींच्या प्रेमाचं आणि समर्पणाचं प्रतीक होतं. ग्रेसला MRKH सिंड्रोम नावाचा दुर्मीळ आजार होता, ज्यामुळे तिचे गर्भाशय पूर्णपणे विकसित झाले नव्हते. हा आजार सुमारे दर 5000 मधून एका महिलेला होतो. 19 व्या वर्षी ही माहिती मिळाल्यानंतर ग्रेसला वाटलं की ,ती कधीही आई होऊ शकणार नाही. मात्र, आधुनिक वैद्यकशास्त्राने तिचं स्वप्न सत्यात उतरवलं. ट्रान्सप्लांटच्या आधी ग्रेस आणि तिचे पती एंगस (37 वर्षांचे) यांनी ‘आयव्हीएफ’ च्या साहाय्याने सात भ्रूण तयार करून फ्रीज करून ठेवले होते. यूटेरस ट्रान्सप्लांटनंतर काही महिन्यांनी एक भ्रूण ट्रान्सफर करण्यात आला. त्यानंतर 27 फेब—ुवारी 2025 रोजी लंडनच्या क्वीन शार्लोट अँड चेल्सिया हॉस्पिटलमध्ये मध्ये नियोजित सिझेरियन शस्त्रक्रियेद्वारे एमीचा जन्म झाला. जन्मावेळी तिचं वजन 4.5 पाऊंड (सुमारे 2 किलो) होतं. ग्रेस म्हणाल्या, “माझ्या हातात ती असताना विश्वासच बसत नव्हता, की ही आमचीच मुलगी आहे. माहिती होतं की ती आमची आहे; पण ते खरंच झालं, हे मान्य करणं अवघड होतं.” एमीचं नाव तिच्या मावशी एमी आणि प्रमुख सर्जन डॉ. इसोबेल क्विरोगा यांच्या सन्मानार्थ ठेवण्यात आलं, ज्यांनी ट्रान्सप्लांट टीमचे नेतृत्व केलं.