Antiviral drug COVID | कोरोना संसर्ग रोखणारे पहिले ‘अँटिव्हायरल’ औषध विकसित! 
विश्वसंचार

Antiviral drug COVID | कोरोना संसर्ग रोखणारे पहिले ‘अँटिव्हायरल’ औषध विकसित!

पुढारी वृत्तसेवा

टोकियो ः कोविड-19 साथीच्या सुरुवातीनंतर तब्बल सहा वर्षांनी वैद्यकीय क्षेत्रात एक अत्यंत दिलासादायक बातमी समोर आली आहे. कोरोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कात आल्यानंतरही इतर लोकांना संसर्ग होण्यापासून रोखणारे जगातील पहिले ‘अँटिव्हायरल’ औषध संशोधकांनी शोधून काढले आहे. ‘एन्सिट्रेल्व्हिर’ (Ensitrelvir) असे या गोळीचे नाव आहे.

या औषधाला सुरुवातीला जपानमध्ये कोरोनावरील उपचारासाठी मंजुरी देण्यात आली होती. मात्र, आता हे औषध कोरोना प्रतिबंधक म्हणूनही वापरण्यास मंजुरी मिळाली आहे. ‘नेचर’ या प्रसिद्ध मासिकाने दिलेल्या वृत्तानुसार, या औषधाच्या अंतिम टप्प्यातील चाचण्यांचे निकाल अत्यंत सकारात्मक आले असून, आता अमेरिका आणि युरोपमधील नियामक मंडळेही याला मंजुरी देण्यावर विचार करत आहेत. जरी आता कोरोनामुळे जगभरात लॉकडाऊन लागत नसला, तरी वृद्ध आणि कमजोर रोगप्रतिकारक शक्ती असलेल्या लोकांसाठी हा विषाणू अजूनही मोठा धोका आहे. फायझर कंपनीचे ‘पॅक्सलोव्हिड’ (Paxlovid) सारखे अँटिव्हायरल औषध संसर्ग झाल्यानंतर त्याचा संसर्ग कमी करण्यासाठी वापरले जाते. मात्र, संसर्ग होण्यापूर्वीच त्याचा प्रतिबंध करेल, असे एकही औषध आतापर्यंत उपलब्ध नव्हते. जपानच्या ‘शिओनोगी’ या फार्मास्युटिकल कंपनीने विकसित केलेले ‘एन्सिट्रेल्व्हिर’ हे औषध कोरोनाचा धोका लक्षणीयरीत्या कमी करते, असा निष्कर्ष 13 मे रोजी प्रसिद्ध झालेल्या ‘द न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिन’ मधील संशोधनातून समोर आला आहे. या औषधाची चाचणी प्रामुख्याने घरात एकत्र राहणार्‍या लोकांवर करण्यात आली, कारण कुटुंब किंवा रूममेटस्कडून कोरोनाचा प्रसार होण्याचा धोका सर्वाधिक असतो. उदाहरणार्थ, जर तुमच्या खोलीतील सोबतीला कोरोना झाला, तर तुम्ही सुरक्षित राहण्यासाठी सोशल डिस्टन्सिंगसोबत ‘एन्सिट्रेल्व्हिर’ गोळी घेऊ शकता.

अशी झाली चाचणी

चाचणीचा कालावधी : जून 2023 ते सप्टेंबर 2024 दरम्यान ही चाचणी घेण्यात आली.

सहभागी लोक : कोरोनाबाधित रुग्णासोबत एकाच घरात राहणार्‍या 2,000 पेक्षा जास्त लोकांवर हा प्रयोग करण्यात आला.

प्रक्रिया : यातील अर्ध्या लोकांना 5 दिवसांसाठी ‘एन्सिट्रेल्व्हिर’चा कोर्स देण्यात आला, तर उर्वरित अर्ध्या लोकांना ‘प्लासिबो’ (Placebo - औषध नसलेली साधी गोळी) देण्यात आली.

‘डबल-ब्लाइंड’ चाचणी : कोणाला कोणती गोळी दिली आहे, हे रुग्ण किंवा संशोधक या दोघांनाही माहित नव्हते, ज्यामुळे या चाचणीचे निकाल अत्यंत अचूक आणि विश्वासार्ह मानले जात आहेत.

हे औषध कसे काम करते?

‘एन्सिट्रेल्व्हिर’ हे औषध कोरोना विषाणूला स्वतःच्या शरीरात नवीन प्रती बनवण्यासाठी आवश्यक असणार्‍या एका मुख्य एन्झाइमला ब्लॉक करते. फायझरचे ‘पॅक्सलोव्हिड’ देखील याच तत्त्वावर काम करते, पण पॅक्सलोव्हिडच्या तुलनेत ‘एन्सिट्रेल्व्हिर’ हे बाधित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या निरोगी व्यक्तीला कोरोनाची लक्षणे विकसित होण्यापासून रोखण्यात कमालीचे यशस्वी ठरले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT