Fire Rainbow | आकाशात तरंगू लागल्या ‘ज्वाळा’... कसा असतो ‘फायर रेनबो’? 
विश्वसंचार

Fire Rainbow | आकाशात तरंगू लागल्या ‘ज्वाळा’... कसा असतो ‘फायर रेनबो’?

पुढारी वृत्तसेवा

वॉशिंग्टन : आकाशात तरंगणाऱ्या हिरव्या, निळ्या आणि नारंगी रंगांच्या ज्वाळा पाहून असे वाटते, जणू ढगांच्यामध्ये आगच नाचत आहे! पहिल्या नजरेत हा नजारा पाहून कोणाचाही श्वास रोखला जाईल की, आकाशात नक्की आग कशी लागली? पण जरा थांबा... ढगांमध्ये दिसणारी ही आगीसारखी रंगीत चमक कोणतीही आग नाही आणि आकाशात झालेला कोणताही अपघातही नाही. वेस्ट व्हर्जिनियाच्या आकाशात टिपलेल्या या अद्‌भुत‌ नजाऱ्याने सोशल मीडियापासून वैज्ञानिक जगतापर्यंत सर्वांनाच आश्चर्यचकित केले आहे. लोक याला ‘फायर रेनबो’ म्हणत आहेत; पण तुम्हाला माहीत आहे का, की पावसाशिवाय आणि आगीशिवाय आकाशात रंगांचा हा अद्‌भुत खेळ कसा घडतो? कदाचित नाही, तर चला सविस्तर जाणून घेऊया...

आकाशात तरंगणाऱ्या हिरव्या, निळ्या आणि नारंगी रंगांच्या ज्वाळा पाहताना जरी आगीसारख्या वाटत असल्या, तरी वैज्ञानिकांचे म्हणणे आहे की, याचा आगीशी कोणताही संबंध नाही आणि हा पावसाच्या इंद्रधनुष्यासारखाही तयार होत नाही. मग प्रश्न पडतो की, हा नक्की काय प्रकार आहे? विज्ञानाच्या जगतात या घटनेला ‘सर्कमहॉरिजॉन्टल आर्क’ (Circumhorizontal Arc) असे म्हणतात. ही एक अत्यंत दुर्मीळ ऑप्टिकल घटना आहे, जी तेव्हा घडते जेव्हा सूर्याची किरणे हवेत असलेल्या लखो लहान बर्फाच्या क्रिस्टल्समधून (स्फटिक) जातात. हा शानदार नजारा २०२१ मध्ये वेस्ट व्हर्जिनियाच्या नॉर्थ फोर्क माऊंटनजवळ कॅमेऱ्यात कैद करण्यात आला होता, ज्यामध्ये ढगांखाली आगीच्या ज्वाळांसारखे रंगीत पॅटर्न तयार झालेले दिसून आले होते. सामान्य इंद्रधनुष्य हे पाऊस पडल्यानंतर हवेतील पाण्याच्या थेंबांवरून सूर्याच्या प्रकाशाचे अपवर्तन (Refraction) आणि परावर्तन (Reflection) झाल्यामुळे तयार होते. फायर रेनबोमध्ये पाण्याच्या थेंबांऐवजी केवळ बर्फाचे स्फटिक असतात आणि हा प्रकार पावसाशिवाय खूप जास्त उंचीवर तयार होतो.

कसा तयार होतो ‘फायर रेनबो’?

ही संपूर्ण प्रक्रिया आकाशात एका नैसर्गिक प्रिझमप्रमाणे काम करते. जेव्हा सूर्याचा प्रकाश सपाट आणि षटकोनी बर्फाच्या स्फटिकांवर आदळतो, तेव्हा त्याचे परावर्तन होऊन तो सात रंगांमध्ये विभागतो. ही घटना घडण्यामागे काही विशिष्ट हवामान स्थितींचे एकाचवेळी जुळून येणे अत्यंत आवश्यक असते. सूर्याची स्थिती : सूर्य आकाशात क्षितिजापासून किमान ५८ अंश उंचीवर असावा लागतो, जेणेकरून प्रकाश योग्य कोनातून स्फटिकांमध्ये प्रवेश करू शकेल. ढगांची उपस्थिती : उच्च आकाशात पातळ ‘सिरस फाईब्रेटस्‌’ ढगांची उपस्थिती असणे गरजेचे आहे. क्रिस्टलची दिशा : या ढगांमध्ये असलेले बर्फाचे लहान स्फटिक क्षितिज (Horizontal) दिशेने एकसमान असावेत. या सर्व अटी एकाचवेळी पूर्ण होणे खूप दुर्मीळ असते, म्हणूनच ‘सरकमहॉरिजॉन्टल आर्क’ पृथ्वीच्या वातावरणात दिसणाऱ्या सर्वात दुर्मीळ नजाऱ्यांपैकी एक मानला जातो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT