प्राचीन नदी  Shashank1 Mishra
विश्वसंचार

Ancient River : ‘ही‌’ नदी आहे डायनासोरपेक्षाही जुनी!

तब्बल 40 कोटी वर्षांचा इतिहास असलेली सर्वात प्राचीन नदी

पुढारी वृत्तसेवा

सिडनी : विज्ञान आणि भूगोलाच्या जगात अनेक अशी रहस्ये दडलेली आहेत, जी मानवी कल्पनेच्या पलीकडची आहेत. आपण अनेकदा हजारो वर्षे जुन्या संस्कृतींबद्दल बोलतो; पण या पृथ्वीवर हजारो किंवा लाखो नव्हे, तर चक्क कोट्यवधी वर्षे जुनी नदी अस्तित्वात आहे, यावर तुमचा विश्वास बसेल का? होय, हे सत्य आहे. ऑस्ट्रेलियाच्या वाळवंटी भागात वाहणारी ‌‘फिंके नदी‌’ जगातील सर्वात जुनी नदी असल्याचे शास्त्रज्ञांनी जाहीर केले आहे. या पृथ्वीवर माणसाचा तर सोडाच; पण डायनासोरचाही जन्म झाला नव्हता, त्या काळापासून ही नदी आपला मार्ग आखत वाहत आहे.

शास्त्रज्ञ आणि भूगर्भशास्त्रज्ञांच्या संशोधनानुसार, फिंके नदी सुमारे 300 ते 400 दशलक्ष (30 ते 40 कोटी) वर्षे जुनी आहे. विज्ञानाच्या भाषेत या काळाला ‌‘पॅलेओझोइक काळ‌’ म्हटले जाते. त्या काळात आपल्या पृथ्वीचा नकाशा आजच्यासारखा नव्हता, तर सर्व खंड एकमेकांशी जोडलेले होते, ज्याला ‌‘पेंजिया महाद्वीप‌’ म्हटले जायचे. काळाच्या ओघात खंड एकमेकांपासून वेगळे झाले आणि वेगवेगळ्या देशांची निर्मिती झाली. या भौगोलिक उलथापालथीत मोठे पर्वत कोसळले, नवीन समुद्र निर्माण झाले; परंतु फिंके नदीने आपला मार्ग बदलला नाही. ती आजही त्याच ठिकाणी वाहत आहे.

या नदीच्या वयाचा अंदाज यावरून लावला जाऊ शकतो की, पृथ्वीवर डायनासोरचे युग आजपासून सुमारे 23 ते 24 कोटी वर्षांपूर्वी सुरू झाले होते. म्हणजेच, जेव्हा या पृथ्वीवर पहिला डायनासोर जन्माला आला, तेव्हाही फिंके नदी करोडो वर्षे जुनी झाली होती. कोट्यवधी वर्षांच्या या प्रवासात पृथ्वीने अनेक भयानक हिमयुगे पाहिली, हवामान बदलले आणि विनाशकारी संकटे आली, ज्यामध्ये डायनासोरचे अस्तित्वच संपून गेले. परंतु, ही नदी प्रत्येक विनाशावर मात करून आजही जिवंत आहे. याच कारणामुळे वैज्ञानिक या नदीला पृथ्वीवरील सर्वात मोठे ‌‘जिवंत आश्चर्य‌’ मानतात. फिंके नदी मध्य ऑस्ट्रेलियाच्या मॅक्डॉनेल पर्वतरांगांमधून उगम पावते आणि ‌‘सिम्पसन वाळवंटाच्या‌’ टोकावर जाऊन संपते.

ऑस्ट्रेलियाचे मूळ रहिवासी या नदीला अत्यंत पवित्र मानतात. स्थानिक आदिवासी समुदाय या नदीला ‌‘लारापिंटा‌’ या नावाने संबोधतात. त्यांच्या प्राचीन लोककथांमध्येही या नदीचा उल्लेख आढळतो. जगाची निर्मिती होत असतानाच या नदीची निर्मिती झाली होती, अशी त्यांची श्रद्धा आहे. फिंके नदीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ही बारमाही नदी नाही. ती ऑस्ट्रेलियाच्या अत्यंत सुक्या आणि वाळवंटी भागातून जात असल्याने वर्षातील बहुतांश महिने ती केवळ सुकी दरी किंवा वाळूचा रस्ता असल्यासारखी दिसते. वरवरून कोरडी दिसत असली तरी, या वाळूच्या पृष्ठभागाखाली पाण्याचे एक खूप मोठे नेटवर्क नेहमी वाहत असते. जेव्हा कधी या भागात मुसळधार पाऊस पडतो, तेव्हा ही कोरडी वाळवंटी नदी अचानक एका अथांग आणि दुथडी भरून वाहणाऱ्या नदीत बदलते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT