आजकाल जेव्हा कोणत्याही मोठ्या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित होतो, तेव्हा सोशल मीडियावर ‘VFX’, ‘CGI’ आणि ‘SFX’सारखे शब्द ट्रेंड करू लागतात. नुकतेच रणबीर कपूर आणि नितेश तिवारी यांच्या बहुप्रतीक्षित ‘रामायण’ चित्रपटाच्या टीझरनंतरही असेच काहीसे पाहायला मिळाले. परंतु, सत्य हे आहे की, अनेक लोक या तिन्हींना एकच समजतात. प्रत्यक्षात ही तिन्ही वेगवेगळी तंत्रज्ञान आहेत, ज्यांचा वापर चित्रपट अधिक भव्य आणि वास्तववादी दाखवण्यासाठी केला जातो. जर तुम्हाला यातील फरक समजला, तर चित्रपट पाहण्याचा तुमचा अनुभव अधिक रंजक होऊ शकतो.
आजची चित्रपटनिर्मिती पूर्वीपेक्षा कितीतरी अधिक प्रगत झाली आहे. ज्या गोष्टींचा विचार करणे पूर्वी कठीण होते, त्या आता स्क्रीनवर सहज दाखवल्या जात आहेत. मोठे राजवाडे, आकाशात उडणार्या वस्तू किंवा दुसर्या जगातील प्राणी, हे सर्व आता सामान्य झाले आहे. मात्र, या सर्वांमागे केवळ कलाकारांचीच नाही, तर तंत्रज्ञानाचीही मोठी मेहनत असते.
काय आहे SFX (Special Effects)?
सर्वात आधी बोलूया ‘SFX’ म्हणजेच स्पेशल इफेक्टस्बद्दल. हे असे इफेक्टस् असतात जे शूटिंगदरम्यान कॅमेर्यासमोरच प्रत्यक्ष केले जातात. म्हणजेच, त्या वेळी सेटवर जे काही दिसत असते, तेच कॅमेर्यात कैद होते. यासाठी कोणत्याही कॉम्प्युटरची गरज भासत नाही.
उदाहरणे : एखाद्या सीनमध्ये आग लावणे, नकली रक्त दाखवणे किंवा काच फुटण्याचा सीन.
याला ‘प्रॅक्टिकल इफेक्टस्’ असेही म्हणतात; कारण हे सर्व प्रत्यक्षात घडते. जुन्या चित्रपटांमध्ये पाऊस किंवा बर्फवृष्टीचे सीन सेटवरच मशिनच्या साहाय्याने किंवा फोम वापरून तयार केले जायचे. आजही अनेक दिग्दर्शक नैसर्गिक अनुभव देण्यासाठी याचा वापर करतात.
काय आहे CGI (Computer Generated Imagery)?
आता वळूया ‘CGI’कडे. नावाप्रमाणेच हे पूर्णपणे कॉम्प्युटरच्या आत तयार केले जाते. यासाठी प्रत्यक्ष शूटिंगची गरज नसते. ज्या गोष्टी या जगात अस्तित्वात नाहीत, त्या तयार करण्यासाठी CGI चा वापर होतो.
उदाहरणे : विचित्र प्राणी, अक्राळविक्राळ राक्षस किंवा एखादे काल्पनिक जग.
हे सर्व 3-D डिझाईन आणि डिजिटल सॉफ्टवेअरच्या मदतीने तयार केले जाते. हॉलीवूड चित्रपटांमधील एलियन्स किंवा सुपरहीरोजचे अनेक सीन्स CGI द्वारेच बनवले जातात. हे तंत्रज्ञान महागडी असले, तरी त्याचा परिणाम अत्यंत थक्क करणारा असतो.
काय आहे VFX (Visual Effects)?
‘VFX’बद्दल लोकांमध्ये सर्वाधिक गोंधळ असतो. VFX हे मुळात CGI आणि रिअल फुटेज (प्रत्यक्ष शूट केलेले द़ृश्य) यांचे मिश्रण असते. म्हणजेच, आधी सीन कॅमेर्याने शूट केला जातो आणि नंतर कॉम्प्युटरच्या मदतीने त्यात बदल केले जातात. हे काम शूटिंगनंतर (Post- production) होते.
कार्यपद्धती : तुम्ही अनेकदा पाहिले असेल की, अभिनेत्याचे शूटिंग ‘ग्रीन स्क्रीन’ समोर केले जाते. नंतर तो हिरवा पडदा हटवून तिथे डोंगर, शहर किंवा एखादा धोकादायक सीन जोडला जातो.
थोडक्यात सांगायचे, तर स्क्रीनवर दिसणार्या गोष्टींपैकी काही खर्या असतात आणि काही कॉम्प्युटरने जोडलेल्या असतात.
कसा ओळखाल या तिन्हींमधील फरक?
सहज सोप्या भाषेत समजून घ्यायचे तर :
SFX : जे सेटवर प्रत्यक्ष (Physically) घडते.
CGI : जे पूर्णपणे कॉम्प्युटरमध्ये तयार केले जाते.
VFX : ज्यात प्रत्यक्ष शूटिंग आणि कॉम्प्युटर या दोन्हीची मदत घेतली जाते.
पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही एखादा चित्रपट पाहाल, तेव्हा या गोष्टींकडे नक्की लक्ष द्या. यामुळे तुम्हाला पडद्यामागची किमया समजेल आणि चित्रपट पाहण्याची मजा द्विगुणीत होईल.