शांघाय : तंत्रज्ञानाच्या जगात चीनने पुन्हा एकदा आपली छाप पाडली आहे. शांघायमधील फुडन युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी मानवी केसांइतकी पातळ आणि लवचिक ‘फायबर चिप’ तयार करण्यात यश मिळवले आहे. या शोधामुळे आता तुमचे कपडे केवळ शरीर झाकण्यासाठीच नव्हे, तर कॉम्प्युटर आणि डिस्प्लेप्रमाणे काम करू शकणार आहेत.
प्राध्यापक पेंग हुइशेंग यांच्या नेतृत्वाखालील टीम गेल्या 10 वर्षांपासून यावर संशोधन करत होती. त्यांनी सिलिकॉनच्या कडक आणि सपाट चिप्सऐवजी लवचिक धाग्यांमध्येच संपूर्ण इलेक्ट्रॉनिक सर्किट बसवले आहे. याला ‘फायबर इंटीग्रेटेड सर्किट’ (ऋखउ) असे नाव देण्यात आले आहे. या धाग्यामध्ये प्रति सेंटिमीटर 1,00,000 ट्रांजिस्टर बसवण्यात आले आहेत. एक मीटर लांब धाग्याची क्षमता एखाद्या आधुनिक कॉम्प्युटरच्या सीपीयू इतकी असू शकते. यात केवळ वीजपुरवठाच नाही, तर रेसिस्टर, कॅपेसिटर, डायोड आणि ट्रांजिस्टर देखील आहेत. हे डिजिटल आणि अॅनालॉग दोन्ही प्रकारचे सिग्नल प्रोसेस करू शकतात.
या चिप्सना 10,000 वेळा वाकवले किंवा रगडले तरी त्या खराब होत नाहीत. त्या 180 अंशांपर्यंत मुडू शकतात आणि 30 टक्क्यांपर्यंत ताणल्या जाऊ शकतात. सर्वसामान्य इलेक्ट्रॉनिक वस्तू पाण्याने खराब होतात, पण हे ‘स्मार्ट कपडे’ मशिनमध्ये 100 पेक्षा जास्त वेळा धुतले तरी व्यवस्थित काम करतात. टेस्टिंग दरम्यान, 100 अंश सेल्सिअस तापमान सहन करण्यासोबतच, 15.6 टन वजनाच्या ट्रकखाली दबल्यानंतरही हे फायबर चिप्स पूर्णपणे सुरक्षित आणि कार्यरत आढळले.
आतापर्यंत स्मार्ट कपड्यांमध्ये जड बॅटरी किंवा बाहेरून चिप्स लावाव्या लागत होत्या. मात्र, या नवीन तंत्रज्ञानामुळे कपड्याचा धागाच स्वतः सेन्सिंग, कॉम्प्युटिंग आणि डिस्प्लेचे काम करेल. यामुळे भविष्यात अशा कपड्यांची निर्मिती होईल जे तुमचे आरोग्य मोजू शकतील, संदेश दाखवू शकतील आणि कॉम्प्युटरप्रमाणे वापरता येतील. नॅनोमीटर-स्केल फोटोलिथोग्राफीच्या मदतीने भविष्यात या ट्रांजिस्टर्सची संख्या आणखी वाढवून या कपड्यांना सुपरकॉम्प्युटर इतके वेगवान बनवण्याचा शास्त्रज्ञांचा मानस आहे.