नवी दिल्ली ः मेथी शरीरासाठी अतिशय लाभकारक ठरते, असे तज्ज्ञ सांगतात. यामध्ये अनेक पोषक तत्त्व आढळतात. खाण्यात स्वादिष्टपणा आणण्यापासून ते अगदी पचनशक्ती चांगली राहण्यापर्यंत मेथी दाण्यांचा वापर करून घेता येतो. मेथी दाण्यांचे पाणी उपाशीपोटी पिण्याचा सल्ला आयुर्वेदिक डॉक्टरांकडूनही देण्यात येतो. भिजवलेल्या मेथी दाण्याचे पाणी हे अनेक आजारांवर गुणकारी ठरते. मेथी दाण्यामध्ये अनेक पोषक तत्त्व असतात. सोडियम, पोटॅशियम, फायबर, लोह, कॅल्शियम, विटामिन डी आणि विटामिन सी च्या पोषक तत्त्वाने मेथी दाण्याचे पाणी भरलेले आहे.
मेथी दाण्याचे पाणी पिण्याने पचनशक्ती सुधारण्यासह शरीरातील कमकुवतपणा कमी होतो आणि हाडेही मजबूत होतात. तसेच पोटातील चरबी कमी होऊन त्वरित वजन कमी होते. मेथीच्या पाण्यामध्ये अँटीबॅक्टेरियल, अँटी इन्फ्लेमेटरी आणि अँटीऑक्सिडंटस् गुण असतात, जे शरीराला हेल्दी ठेवत अनेक आजारांना दूर करतात. तुम्हाला बर्याच काळापासून वजन कमी करायचे असेल, तर मेथीचे पाणी यासाठी उपयुक्त ठरू शकते. या पाण्यात अधिक प्रमाणात फायबर असते, जे पोट भरलेले ठेवते. यामुळे अतिरिक्त भूक लागत नाही आणि उगीचच पदार्थ खाल्ले जात नाहीत. यामुळे वजन कमी करण्यास मदत मिळते. तसेच मेथी दाण्यातील आढळणारे गुण पोटावरील चरबी जाळण्यास मदत करतात. भिजवलेल्या मेथी दाण्याचे पायामुळे पचनाशी निगडित समस्या दूर होतात. हे पाणी पोटातील गॅस, अपचन आणि बद्धकोष्ठतेची समस्या दूर करण्यास मदत करते. भिजवलेल्या मेथी पाण्याच्या सेवनाने मधुमेह अर्थात डायबिटीस नियंत्रणात येण्यास मदत मिळते. मेथी रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यास मदत करते. हृदयाशी संबंधित आजार कमी करण्यासाठीही भिजवलेल्या मेथी दाण्याच्या पाण्याचा उपयोग करून घेता येतो. मेथीचे पाणी पिण्याने ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी होतो आणि हार्टसंबंधी आजारांपासून बचाव होतो. तसेच या पाण्यामुळे कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात येण्यास मदत मिळते.