Fenugreek greens benefits | हिवाळ्यात मेथीची भाजी ठरते आरोग्यदायी घटकांचा खजिना! File Photo
विश्वसंचार

Fenugreek greens benefits | हिवाळ्यात मेथीची भाजी ठरते आरोग्यदायी घटकांचा खजिना!

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली ः हिवाळ्याच्या काळात हिरव्या पालेभाज्यांचा आहारात मोठ्या प्रमाणावर समावेश केला जातो आणि त्या शरीरासाठी आरोग्यदायीही असतात. या काळात बाजारात हिरवीगार मेथी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होते. हिवाळ्यात मेथीचे सेवन करणे अत्यंत फायदेशीर मानले जाते.

मेथी केवळ एक चवदार भाजी नाही, तर आयुर्वेदिक गुणांचा एक अनमोल खजिना आहे. याचे नियमित सेवन केल्याने आपले शरीर आतून मजबूत होते आणि रोगप्रतिकारशक्ती वाढते, असे तज्ज्ञ सांगतात. मेथी शरीरातील वात, पित्त आणि कफ या तिन्ही दोषांना संतुलित ठेवते. त्यामुळे मेथीचा आहारात समावेश करणे आवश्यक आहे. मेथी खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे मिळतात. मेथी खाल्ल्याने पचनशक्ती सुधारते. यामुळे गॅस, पोट फुगणे (ब्लोटिंग), बद्धकोष्ठता आणि जेवणानंतर जाणवणारे जडत्व कमी होते. हे आतड्यांचे आरोग्य सुधारून अन्न योग्यरीत्या शोषले जाण्यास मदत करते.

आयुर्वेदामध्ये मेथीला मधुमेह दूर करणारी मानले आहे. ती इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी वाढवते आणि रक्तातील ग्लुकोजची पातळी स्थिर ठेवण्यास मदत करते. मेथीमध्ये अँटी-इंफ्लेमेटरी (सूज विरोधी) गुणधर्म असतात. यामुळे हिवाळ्यामध्ये होणारे सांध्यांचे जडत्व, वेदना आणि त्वचेवरील सूज यांसारख्या समस्यांमध्ये आराम मिळतो. मेथीचे नियमित सेवन केल्यास रक्त शुद्ध होते. यामुळे त्वचेवर तेज येते आणि मुरुमे कमी होतात. तसेच, संपूर्ण शरीराचे डिटॉक्सिफिकेशन चांगल्या प्रकारे होते. मेथी यकृताच्या चयापचय क्रियेला मदत करते आणि शरीरातील अतिरिक्त विषारी पदार्थ बाहेर काढण्यास साहाय्य करते. यामुळे शरीरातील ऊर्जेची पातळी वाढते आणि तुम्हाला दिवसभर उत्साही वाटते.

मेथीच्या पानांमध्ये पुरेसा नैसर्गिक लोह असतो. अ‍ॅनिमिया (रक्ताची कमतरता), थकवा आणि केस गळणे यांसारख्या समस्यांवर ही अत्यंत फायदेशीर आहे. मेथीमधील शीतल आणि कडू गुणधर्मामुळे शरीरातील अतिरिक्त पित्त कमी होते. यामुळे अंतर्गत उष्णता आणि जळजळ कमी होऊन त्वचा स्वच्छ, चमकदार आणि मुरुममुक्त बनते. मेथी चयापचय जलद करते, अनावश्यक खाण्याची तीव— इच्छा कमी करते आणि चरबीच्या पचनात सुधारणा करते, ज्यामुळे वजन नैसर्गिकरीत्या नियंत्रित राहते. मेथी ही बाळाला स्तनपान करणार्‍या मातांमध्ये दुधाचे उत्पादन वाढवण्यासाठी ओळखली जाते. यात गॅलेक्टागॉग नावाचा घटक असतो. तसेच, प्रसूतीनंतर आरोग्याला पोषण देते. मेथीमध्ये जीवनसत्त्वे (व्हिटॅमिन), लोह आणि अँटिऑक्सिडंटस् भरपूर असतात, जे केसांची मुळे मजबूत करतात, कोंडा कमी करतात आणि केसांची वाढ करतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT