Rome Female Gladiators | रोमन साम्राज्यात महिला ग्लॅडिएटर्सही होत्या! 
विश्वसंचार

Rome Female Gladiators | रोमन साम्राज्यात महिला ग्लॅडिएटर्सही होत्या!

1,700 वर्षांपूर्वीच्या चित्रात उघड केली माहिती

पुढारी वृत्तसेवा

रीम्स (फ्रान्स) : रोमन साम्राज्यातील महिला योद्ध्यांबाबत (वूमेन ग्लॅडिएटर्स) एक अत्यंत धक्कादायक आणि ऐतिहासिक माहिती पुढे आली आहे. 1,700 वर्षांपूर्वीच्या एका प्राचीन चित्रावरून हे सिद्ध झाले आहे की, रोमन साम्राज्याच्या काळात केवळ पुरुषच नाही, तर महिला ग्लॅडिएटर्सदेखील मैदानात हिंस्त्र प्राण्यांशी झुंज देत असत. त्यांना हंट्रेस किंवा व्हेनाट्रिक्स म्हटले जात असे.

इतिहास संशोधकांना प्रथम प्राचीन चित्राचा पुरावा सापडला आहे, ज्यामध्ये एक महिला योद्धा (ज्याला हंट्रेस किंवा व्हेनाट्रिक्स म्हटले जायचे) एका बिबट्याशी लढताना दिसत आहे. हे चित्र फ्रान्समधील रीम्स येथे 1860 मध्ये सापडलेल्या एका प्राचीन मोझॅकचा (खड्यांपासून बनवलेले चित्र) भाग आहे. कॅलिफोर्निया विद्यापीठाच्या संशोधकांनी या चित्राचा अभ्यास केला असता, त्यात एक महिला योद्धा बिबट्याचा पाठलाग करताना आणि त्याला दुसर्‍या पुरुष योद्ध्याकडे ढकलताना दिसत आहे. अशा प्रकारच्या महिला योद्ध्यांना व्हेनाट्रिक्स म्हटले जात असे.

संशोधक अल्फोन्सो माणास यांच्या मते, या महिला योद्ध्या अनेकदा टॉपलेस (वरच्या शरीरावर कपडे नसलेल्या) अवस्थेत लढत असत. याची दोन मुख्य कारणे सांगितली जातात. दूरवरून किंवा लांबून प्रेक्षकांना ती योद्धा महिला आहे, हे स्पष्टपणे कळावे. तसेच, प्रेक्षकांमध्ये कामुकता किंवा लैंगिक आकर्षण निर्माण करून गर्दी खेचणे हा त्यामागचा एक उद्देश असायचा. हे चित्र इसवी सनाच्या तिसर्‍या शतकातील आहे. रीम्स हे शहर त्यावेळी रोमन साम्राज्याचे एक प्रमुख केंद्र होते. हे चित्र बहुदा एखाद्या श्रीमंत व्यक्तीच्या घरातील असावे, ज्याने अशा खेळांचे आयोजन केले असावे. संशोधकांच्या मते, या महिला उच्चभ्रू कुटुंबातील नसून, एकतर गुन्हेगार असायच्या ज्यांना शिक्षेचा भाग म्हणून लढायला लावले जायचे किंवा अत्यंत गरीब वर्गातील असायच्या ज्यांनी स्वतःहून हे काम स्वीकारले होते.

इतिहासातील दुर्मीळ नोंद

रोमन साहित्यात महिला ग्लॅडिएटर्सचे उल्लेख आढळतात, परंतु त्यांची चित्रे किंवा द़ृश्य पुरावे आतापर्यंत उपलब्ध नव्हते. इसवी सन 200 मध्ये रोमन साम्राज्यात महिलांना मानवी ग्लॅडिएटर्स म्हणून लढण्यावर बंदी घालण्यात आली होती. परंतु, प्राण्यांशी लढणार्‍या हंट्रेसवर ही बंदी नव्हती, असे या नव्या पुराव्यावरून दिसून येते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT