जगातील सर्वात वेगवान विमाने Pudhari File Photo
विश्वसंचार

जगातील सर्वात वेगवान विमाने

जगभरात प्रवासी, मालवाहू, लढाऊ अशी अनेक प्रकारची विमाने पाहायला मिळतात

पुढारी वृत्तसेवा

सर्वात वेगवान व आरामदायक प्रवास म्हणजे हवाई प्रवास. जगभरात प्रवासी, मालवाहू, लढाऊ अशी अनेक प्रकारची विमाने पाहायला मिळतात. त्यापैकी सर्वात वेगवान विमानांची ही माहिती...

नासा एक्स-43 :

अमेरिकेतील ‘नासा’चे ‘एक्स-43’ हे विमान जगातील सर्वात वेगवान विमान म्हणून ओळखले जाते. हे विमान ताशी 11,854 किलोमीटर इतक्या वेगाने उड्डाण करू शकते. हे विमान इतके शक्तिशाली आहे की, ते बोईंग-52 वरून उड्डाण करण्यासाठी सोडले जाते. ‘नासा’ने अशी तीन ‘एक्स-43’ विमाने बनवली होती. त्यापैकी दोन समुद्रात बुडाली. या विमानाची क्षमता सुमारे दोन तासांतून एक पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालण्याची आहे.

लॉकहीड एसआर - 71 ब्लॅकबर्ड :

हे विमान जरी 1999 पासून सेवेत नसले, तरी ताशी 4,042 किलोमीटर वेगाने उड्डाण करणारे दुसरे सर्वात वेगवान विमान आहे. शीतयुद्धाच्या काळात शत्रूची माहिती गोळा करण्यासाठी याचा वापर केला जात असे. जास्त उंचीवरून उडण्याच्या त्याच्या क्षमतेमुळे त्याला विक्रमी नोंदीत स्थान मिळाले.

मिग-25 फॉक्सबॅट :

1964 मध्ये पहिल्यांदा उड्डाण करणारे ‘मिग-25’ अजूनही तिसर्‍या क्रमांकाचे सर्वात वेगवान जेट आहे. ताशी 3,466 किलोमीटर वेगाने उड्डाण करणारे हे विमान अजूनही अनेक देशांमध्ये वापरले जाते.

मिग-31फॉक्सहाऊंड :

हे विमान ‘मिग-25’ ची सुधारित आवृत्ती आहे. ते जास्त उंचीवर तसेच कमी उंचीवरही उड्डाण करण्यास सक्षम आहे. त्याचा कमाल वेग ताशी 3,466 कि.मी. आहे.

एफ-15 ईगल :

हे लढाऊ विमान ताशी 3,087 कि.मी. वेगाने उड्डाण करू शकते. सुमारे 50 वर्षांपासून ते त्याची उच्च गती व अचूक लढाऊ कौशल्यासाठी विश्वसनीय राहिले आहे.

सुखोई एसयू-फ्लँकर :

ताशी 2,878 कि.मी. वेगाने उड्डाण करणारे हे विमान त्याच्या बहुमुखी क्षमतेसाठी प्रसिद्ध आहे. ते काही मिनिटांमध्येच आकाशात 12 कि.मी. उंचीवर पोहोचू शकते!

मिग-23 फ्लॉगर :

साठ वर्षे जुन्या डिझाईनवर आधारित हे विमान ताशी 2,878 कि.मी. वेगाने उडते. त्याची हलकी रचना आणि मोठा वेग हे जवळच्या लढायांसाठी उपयुक्त ठरतात.

एफ-14 टॉमकॅट :

‘टॉप गन’ चित्रपटात ‘प्रमुख भूमिकेत’ असलेले ‘एफ-14’ हे विमान ताशी 2,889 कि.मी. वेगाने उडू शकते. त्याची दोन आसनी रचना आणि विशेष क्षमता यामुळे ते जगप्रसिद्ध आहे.

मिग-29 फुलक्रम :

हे हलके लढाऊ विमान ताशी 2,817 कि.मी. वेगाने उडू शकते. या विमानाचीही अनेक वैशिष्ट्ये आहेत.

एफ-22 रॅप्टर :

ताशी 2,778 कि.मी. वेगाने उड्डाण करणारे हे विमान रडारवर दिसत नाही. हे अमेरिकेचे सर्वात प्रगत लढाऊ विमान आहे. आतापर्यंत त्यामधील फक्त 187 युनिटस्चे उत्पादन झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT