कॅनबेरा : कोणाचं नशीब केव्हा उघडणार हे काही सांगता येत नाही. ऑस्ट्रेलियात एक शेतकरी सोन्याचा शोध घेत होता. तेव्हा त्याला शेतात असं काही मिळालं की, त्याचे डोळे चमकले. मेटल डिटेक्टरने तो ओसाड जागेवर सोन्याचा शोध घेत होता. तेव्हा त्याच्या हाती बटाट्यासारखा एक मौल्यवान दगड हाती लागला. त्याने या व्यक्तीचे नशीब चमकवलं. सोन्याचा हा तुकडा बटाट्यासारखा होता. त्याचे वजन जवळपास १.२ किलोग्राम इतके होते. त्याची किंमत एक कोटी इतकी आहे.
एबीसी वृत्तसंस्थेनुसार, ऑस्ट्रेलियातील न्यू साऊथ वेल्स येथील टिबूबुरा जवळ स्टर्ट स्टोनी डेजर्ट हा भाग आहे. या पट्ट्यात अनेकजण सोन्याचा शोध घेण्यासाठी येतात. या परिसरातील एक शेतकरी सुद्धा या परिसरात नशीब आजमावण्यासाठी पोहोचला. मेटल डिटेक्टरच्या मदतीने ही व्यक्ती सोन्याचा शोध घेत होती. सुरुवातीला मशिनकडून काही खास सिग्नल मिळाले नाही; पण खोदकाम केल्यानंतर जवळपास १०० मिलीमीटर खोलवर मेटल डिटेक्टरवर सिग्नल मिळाले. त्याने माती दूर केली. तेव्हा चमकदार पिवळ्या रंगाचा बटाट्याइतका तुकडा हाती लागला. तो सोन्याचा होता. त्याला ‘टिबूबुरा स्पड’ असे नाव देण्यात आले.
इंग्रजीत ‘स्पड’ हा बटाट्यासाठी वापरला जातो. या सोन्याच्या तुकड्याचे एकूण वजन जवळपास १.२ किलोग्रॅम होते. यामध्ये जवळपास ९४० ग्रॅम शुद्ध सोने सापडले. जेव्हा हा तुकडा मिळाला, तेव्हा त्याची किंमत जवळपास १.९५ लाख ऑस्ट्रेलियन डॉलर इतकी नोंदवली गेली; पण बाजारात सोन्याचा भाव घसरला. यामुळे या सोन्याच्या तुकड्याची अंदाजित किंमत घसरून जवळपास १.६० लाख ऑस्ट्रेलियन डॉलर इतकी झाली. भारतीय चलनात ही रक्कम एक कोटीच्या घरात पोहोचते. या शेतकऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात आले आहे. अनेक दिवसांपासून तो या भागात सोन्याचा शोध घेत होता. अखेर त्याच्या हाती हा सोन्याचा तुकडा लागला!