क्वालालंपूर : मलेशियाची राजधानी क्वालालंपूरपासून अवघ्या १३ किलोमीटर अंतरावर वसलेल्या ‘बाटू गुहा’ आणि येथील श्री सुब्रह्मण्यम मुरुगन मंदिर हे जगभरातील हिंदू भाविकांचे आणि पर्यटकांचे एक प्रमुख श्रद्धास्थान आहे. सुमारे ४०० दशलक्ष (४० कोटी) वर्षे जुन्या नैसर्गिक चुनखडीच्या टेकड्यांमध्ये आणि भव्य गुहेमध्ये हे भगवान कार्तिकेयाचे मंदिर वसलेले आहे. या मंदिराचे सर्वात मुख्य आणि आकर्षक वैशिष्ट्य म्हणजे मंदिराच्या पायथ्याशी असलेली भगवान मुरुगनची (कार्तिकेय) भव्य मूर्ती. या मूर्तीची उंची १४०.७ फूट (सुमारे ४२.७ मीटर) असून, ही भगवान मुरुगनची जगातील सर्वात उंच मूर्ती मानली जाते.
ही मूर्ती बनवण्यासाठी सुमारे ३५० टन काँक्रीट, १५५ लिटर सोनेरी रंग आणि ३०० लिटर लिक्विड सोने वापरण्यात आले होते. ही मूर्ती साकारण्यासाठी भारतासह अनेक देशांतील कुशल शिल्पकारांनी परिश्रम घेतले होते. गुहेच्या आतील मुख्य मंदिरात पोहोचण्यासाठी भक्तांना २७२ पायऱ्या चढाव्या लागतात. २०१८ मध्ये या संपूर्ण पायऱ्या आणि आजूबाजूचा परिसर चमकदार आणि विविध रंगांनी रंगवण्यात आला. त्यामुळे लांबून पाहताना या पायऱ्या एखाद्या इंद्रधनुष्यासारख्या अत्यंत विलोभनीय दिसतात. पायऱ्या चढून वर गेल्यावर गुहेच्या आत अत्यंत भव्य आणि निसर्गनिर्मित उंच छत पाहायला मिळते, जिथून सूर्यप्रकाश थेट गुहेच्या आत येतो. दरवर्षी जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यात येथे ‘थाईपुसम’ हा भव्य धार्मिक उत्सव साजरा केला जातो.
या उत्सवादरम्यान मलेशिया, भारत, सिंगापूर आणि जगभरातून १० लाखांहून अधिक भाविक येथे जमतात. भक्त आपल्या अंगावर कावडी, मोरपंख आणि सोन्या-चांदीचे भाले टोचून कडक नवस फेडण्यासाठी या २७२ पायऱ्या चढतात. १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात (साधारण १८९१ मध्ये) भारतीय व्यापारी के. थंबूस्वामी पिल्लई यांनी या गुहेच्या प्रवेशद्वाराचा आकार भगवान मुरुगन यांच्या हातातील ‘वेल’ (भाला) सारखा असल्याचे पाहिले. त्यानंतर त्यांनी येथे भगवान मुरुगन यांची स्थापना केली आणि तेव्हापासून हे स्थळ एक जगप्रसिद्ध धार्मिक केंद्र बनले. आज बाटू गुहा केवळ धार्मिक श्रद्धेचे केंद्र राहिले नसून मलेशियातील सर्वात जास्त भेट दिलेल्या पर्यटन स्थळांपैकी एक बनले आहे.