AI clone human | मृत मुलाला जिवंत ठेवण्यासाठी कुटुंबाने बनवला एआय क्लोन 
विश्वसंचार

AI clone human | मृत मुलाला जिवंत ठेवण्यासाठी कुटुंबाने बनवला एआय क्लोन

वृद्ध आईला धक्क्यापासून वाचवण्यासाठी अनोखा प्रयत्न!

पुढारी वृत्तसेवा

बीजिंग : विज्ञानाच्या प्रगतीने आज मानवाला अशा वळणावर आणून ठेवले आहे, जिथे मृत्यूलाही काही काळासाठी डिजिटल स्वरूपात रोखता येते. चीनमधील एका कुटुंबाने आपल्या मृत मुलाची बातमी 80 वर्षांच्या वृद्ध आईपासून लपवण्यासाठी चक्क आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) चा आधार घेतला असून, मुलाचा हुबेहूब डिजिटल क्लोन तयार केला आहे.

गेल्या वर्षी चीनच्या शेंडोंग प्रांतात एका तरुणाचा भीषण रस्ते अपघातात मृत्यू झाला. हा तरुण आपल्या वृद्ध आईचा एकुलता एक मुलगा होता. आईला आधीच हृदयाचा त्रास असल्याने, मुलाच्या मृत्यूची बातमी ऐकून तिला मोठा धक्का बसू शकतो आणि त्यात तिचा जीव जाऊ शकतो, अशी भीती कुटुंबाला वाटत होती. त्यामुळेच मुलाच्या मृत्यूची बातमी लपवून तिला एआय मुलाच्या मदतीने धीर देण्याचा निर्णय कुटुंबाने घेतला.

असा तयार झाला डिजिटल मुलगा

कुटुंबाने जिआंगसू प्रांतातील एआय तज्ज्ञ झेंग झेवेई यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी मृत मुलाचे जुने फोटो, व्हिडीओ, ऑडिओ रेकॉर्डिंग्स आणि बोलण्याच्या विशिष्ट पद्धतीचा (स्थानिक बोलीभाषा) अभ्यास करून एक डिजिटल अवतार तयार केला. हा एआय अवतार बोलताना अगदी मृत तरुणासारखाच किंचित पुढे वाकून बोलतो. हा डिजिटल मुलगा दररोज चॅट अ‍ॅपच्या माध्यमातून आईशी व्हिडीओ कॉलवर संवाद साधतो.

आई आजही अनभिज्ञ

व्हिडीओ कॉलवर बोलताना आई आपल्या मुलावरचं प्रेम व्यक्त करते, त्याला वारंवार फोन करायला सांगते आणि त्याची आठवण येत असल्याचं सांगते. यावर तो एआय अवतार अत्यंत नैसर्गिकपणे उत्तर देतो. ‘मी कामात खूप व्यस्त आहे, त्यामुळे जास्त वेळ बोलू शकत नाही. तुम्ही स्वतःची काळजी घ्या, मी खूप पैसे कमावले की लवकरच घरी येईन,’ असे आश्वासन तो आईला देतो. यामुळे आईला आपला मुलगा दुसर्‍या शहरात कामात व्यस्त आहे, असेच वाटत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT