Aircraft Fake Signals Increasing | विमानाच्या कॉकपिटमध्ये वाढताहेत ‘फेक’ सिग्नल्स 
विश्वसंचार

Aircraft Fake Signals Increasing | विमानाच्या कॉकपिटमध्ये वाढताहेत ‘फेक’ सिग्नल्स

पुढारी वृत्तसेवा

पॅरिस : टेरैन अहेड. पुलअप! (समोर धोका आहे, विमान वर घ्या!)... हा एक असा थरारक इशारा आहे, जो सहसा एखाद्या आपत्तीकाळात किंवा फ्लाइट सिम्युलेटरमध्येच ऐकायला मिळतो. परंतु, आजकाल व्यावसायिक विमानांच्या कॉकपिटमध्ये हा इशारा वारंवार येत असल्याने वैमानिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. याचे मुख्य कारण म्हणजे जागतिक स्थाननिश्चिती उपग्रहांडून (जीपीएस) मिळणारे 'बोगस किंवा बनावट सिग्नल्स' (जीपीएस स्फुफिंग). मध्य पूर्व (इराण युद्ध भाग), बाल्टिक समुद्र आणि काळा समुद्र यांसारख्या संघर्षग्रस्त भागांमधून उडणाऱ्या विमानांना या समस्येचा सर्वाधिक फटका बसत आहे. लष्करी कारवायांसाठी शत्रूचे ड्रोन किंवा क्षेपणास्त्रे भरकटवण्यासाठी सैन्य दलांकडून हाय-इंटेन्सिटी रेडिओ सिग्नल्स सोडले जातात. मात्र, याचा नाहक त्रास व्यावसायिक विमानांना होत आहे.

या ‘जीपीएस इंटरफेरन्स’मुळे विमानाची ‘ग्राउंड प्रॉक्सिमिटी वॉर्निंग सिस्टम’ खोट्या सिग्नल्सना खरे मानते आणि विमान सुरक्षित उंचीवर असतानाही वैमानिकांना इमर्जन्सी अलार्म ऐकू येतात. 'इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ एअर लाईन पायलट्स असोसिएशन'चे अध्यक्ष कॅप्टन रॉन हे यांच्या मते, रोज सुमारे ९०० विमानांना या समस्येचा सामना करावा लागत आहे. सर्वात मोठा धोका हा आहे की, वैमानिक आता या धोक्याच्या इशाऱ्यांना नेहमीचीच गोष्ट (नॉर्मल) समजू लागले आहेत, ज्यामुळे भविष्यात खऱ्या धोक्याच्या वेळी त्यांचा यंत्रणेवरील विश्वास उडू शकतो, असे कॅप्टन रॉन हे यांनी सांगितले.

यूएस फेडरल एव्हिएशन ॲडमिनिस्ट्रेशनच्या २०२६च्या अहवालानुसार, बनावट सिग्नल्समुळे विमानाचा नकाशा अचानक मूळ मार्गापासून मैलोन्‌मैल दूर सरकतो. काही वेळा विमान धावपट्टीवर उभे असतानाही स्क्रीनवर ते भलतीकडेच असल्याचे दिसते. एका वैमानिकाने सांगितले की, सिग्नल्स बिघडल्यावर कॉकपिटमधील स्क्रीन एखाद्या 'काल्पनिक कथेसारखी' भासते. अशा वेळी वैमानिकांना अलार्म बंद करावा लागतो आणि १९७०च्या दशकाप्रमाणे जमिनीवरील जुन्या रडार यंत्रणेवर अवलंबून राहावे लागते.

या समस्येचा थेट परिणाम प्रवाशांच्या सुरक्षेवर होत नसला, तरी यामुळे विमानांचे मार्ग बदलतात, प्रवासाचा वेळ वाढतो आणि इंधनाचा खर्चही वाढतो. परंतु, हा धोका पूर्णपणे दुर्लक्षण्याजोगा नाही. २५ डिसेंबर २०२४ रोजी अझरबैजान एअरलाइन्सच्या विमानाचा कझाकस्तानात झालेला अपघात याच जीपीएस बिघाडामुळे आणि खराब हवामानामुळे झाला होता, ज्यात ३८ जणांचा मृत्यू झाला होता.

सध्या यावर कोणताही झटपट उपाय उपलब्ध नाही. तंत्रज्ञान कंपन्या आता अशा अँटेनावर काम करत आहेत ज्या खोट्या सिग्नल्सना फिल्टर करू शकतील. तसेच युरोपियन स्पेस एजन्सी नवीन उपग्रह प्रक्षेपणाद्वारे सिग्नल्स अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु, जोपर्यंत नवीन तंत्रज्ञान येत नाही, तोपर्यंत वैमानिकांचे विशेष प्रशिक्षण आणि मानसिक सजगता हाच या वाढत्या धोक्यावर एकमेव मार्ग आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT