जकार्ता : जग रहस्यांनी भरलेले आहे. परंतु, काही गोष्टी विज्ञानालाही अवाक् करतात. इंडोनेशियातील मुरांग कुटुंबाची कहाणी याचंच एक उदाहरण आहे. या कुटुंबातील सदस्यांच्या चेहर्याचा आकार रोज बदलत असतो. स्थानिक लोक त्यांना मानव नसून पाल किंवा सरडे मानतात; पण जेव्हा डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली तेव्हा त्यांना जे आढळलं ते सर्वांनाच आश्चर्यचकित करणारं होतं.
मुरांग कुटुंब इंडोनेशियातील एका दुर्गम भागात राहते. सूर्या मुरांग नावाच्या एका सदस्याचा लहानपणी चेहरा पूर्णपणे सामान्य होता; पण सूर्या 12 वर्षांचा झाल्यावर विचित्र बदल होऊ लागले. हळूहळू त्याच्या चेहर्यात बदल होऊ लागले. त्याचे डोळे फुगले, त्वचा घट्ट झाली आणि त्याचा चेहरा पालीसारखा दिसू लागला. सर्वात भयावह गोष्ट म्हणजे हे बदल एकाच दिवसात जाणवू शकतात. सकाळी वेगळा चेहरा आणि संध्याकाळी वेगळा चेहरा. फक्त सूर्याच नाही, तर त्याच्या मुलांनाही ही विचित्र घटना अनुभवायला मिळाली. त्यांचे चेहरे दररोज बदलू लागले.
कधीकधी त्यांच्या नाकांचा आकार वेगळा असायचा, कधीकधी त्यांचे जबडे मोठे व्हायचे आणि कधीकधी त्यांचे डोळे पूर्णपणे बदलायचे. जवळपास राहणारे लोक या कुटुंबाला घाबरू लागले. गावात अफवा पसरल्या की, हे लोक माणसं नाहीत. अनेकजण असा दावा करू लागले की, ते रात्रीच्या वेळी पाल किंवा सरड्यांमध्ये रूपांतरित होतात. स्थानिक लोक म्हणतात की, त्यांचे चेहरे दररोज सकाळी वेगळे आकार घेतात. त्यांची त्वचा विचित्रपणे ताणलेली आणि कडक होते. त्यांचे डोळे पाल किंवा सरड्यांसारख्या रचनांसारखे दिसतात. म्हणूनच लोक त्यांना माणूस म्हणून स्वीकारताना थोडे कचरतात. काहीजण त्यांच्याकडे जाण्यासही घाबरतात.
जेव्हा डॉक्टरांनी तपासणी केली तेव्हा त्यांनी याला आनुवंशिक विकाराशी जोडले. त्यांचा असा विश्वास आहे की, हा एक दुर्मीळ आनुवंशिक आजार असू शकतो, ज्यामध्ये चेहर्याची हाडे आणि त्वचा असामान्यपणे वाढते किंवा बदलते. या आजाराचे अद्याप कोणतेही निश्चित नाव सापडलेले नाही. तसेच, त्यावर कोणताही स्पष्ट उपचार सापडलेला नाही. तसेच, दिवसा चेहर्यावरील बदलांचे स्पष्टीकरणदेखील स्थापित झालेले नाही, म्हणूनच हे प्रकरण गूढच राहिले आहे.