वॉशिंग्टन : खगोलशास्त्रज्ञांनी आपल्या सौरमालेपासून सुमारे 2,472 प्रकाशवर्षे दूर असलेल्या एका तार्याभोवती फिरणार्या विशाल ‘सुपर-अर्थ’ प्रकारच्या ग्रहाचा शोध लावला आहे. या बाह्यग्रहाचे वातावरण अत्यंत टोकाचे असून, त्याच्या कक्षेतील केवळ काही विशिष्ट काळातच तो जीवसृष्टीसाठी अनुकूल असू शकतो, असे संशोधकांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे, या ग्रहाचा शोध कोणत्याही प्रत्यक्ष निरीक्षणाशिवाय लावण्यात आला आहे, ही या शोधाची सर्वात उल्लेखनीय बाब आहे.
‘केप्लर-725सी’ असे नाव देण्यात आलेल्या या बाह्यग्रहाचा शोध ‘संक्रमण वेळ तफावत’ (Transit Timing Variations - TTVs) नावाच्या संकल्पनेमुळे शक्य झाला आहे. जेव्हा एखादा ग्रह आपल्या तार्यासमोरून जातो, तेव्हा तार्याच्या प्रकाशाचा काही भाग अडवला जातो. तार्याच्या प्रकाशमानतेतील या घट होण्याच्या आधारावर संक्रमण करणार्या ग्रहाचा आकार निश्चित केला जातो. ‘नासा’च्या केप्लर अंतराळ दुर्बिणीने याच पद्धतीने 3,300 हून अधिक बाह्यग्रहांचा शोध लावला आहे. तथापि, या पद्धतीला काही मर्यादा आहेत.
या तंत्रात तार्याच्या अगदी जवळ आणि कमी कक्षेत फिरणारे ग्रह शोधण्याकडे अधिक कल असतो. कारण, ते वारंवार संक्रमण करतात आणि सहज दिसतात. तसेच, संक्रमण दिसण्यासाठी ग्रहाची भ-मण कक्षा आणि आपली द़ृष्टीरेषा यात अचूक संरेखन आवश्यक असते. थोडासा जरी बदल झाला, तरी दूरच्या कक्षेतील ग्रह दिसू शकत नाहीत. परंतु, अशा न दिसणार्या दूरच्या कक्षेतील ग्रहांमुळेही त्यांच्या अस्तित्वाची जाणीव होऊ शकते, ती म्हणजे ‘संक्रमण वेळ तफावती’च्या माध्यमातून. सामान्यतः, ग्रहांचे संक्रमण घड्याळाच्या काट्याप्रमाणे नियमित असते. मात्र, काही प्रकरणांमध्ये, खगोलशास्त्रज्ञांना असे आढळून आले आहे की, एखाद्या ग्रहाच्या संक्रमणास विलंब होऊ शकतो किंवा ते वेळेपूर्वी घडू शकते. असे होण्यामागे त्याच तार्याभोवती फिरणार्या इतर ग्रहांचे गुरुत्वाकर्षण कारणीभूत असते, जे संक्रमण करणार्या ग्रहाला ओढतात.