नवी दिल्ली : आजच्या डिजिटल युगात सोशल मीडियावरील रिल्स हे मनोरंजनाचे सर्वात लोकप्रिय साधन बनले आहे. काही सेकंदांचे हे व्हिडीओ आकर्षक असल्याने अनेक जण दिवसातून तासन्तास रिल्स स्क्रोल करत बसतात. एवढेच काय तर कामातून फक्त काही मिनिटांचा वेळ मिळाला, तसेच झोपताना आणि झोपण्याच्या आधी देखील रिल्स पाहिल्या जातात. हे आश्चर्यकारक वाटेल, पण रिल्स पाहता पाहता अनेकजण त्यांना भूक लागली आहे हे देखील विसरतात. अशा व्यक्तींना ‘रिल्स अॅडिक्ट’ असे म्हटले जाते. कारण सततची रिल्स पाहण्याची सवय कोणत्याही व्यसनापेक्षा कमी नाही. तज्ज्ञांच्या मते ही सवय मेंदूवर गंभीर परिणाम करू शकते आणि हळूहळू मानसिक आरोग्याचे नुकसान होण्याची शक्यता वाढते.
रिल्समध्ये नवीन, मनोरंजक सामग्रीचा सतत प्रवाह मेंदूमध्ये जलद गतीने आणि वारंवार डोपामाईन सोडण्याचा मदत करतो. ज्यामुळे इतर व्यसनांप्रमाणे तृष्णा आणि आवेगपूर्ण वर्तनाचे चक्र तयार होते. यामुळे मेंदूची लक्ष केंद्रित करण्याची क्षमता कमी होते आणि अभ्यास किंवा काम कंटाळवाणे वाटू लागते. कोणतेही काम करताना किंवा वाचताना लक्ष एकाग्र करणे कठीण होते. सतत आणि जलद डोपामाईनमुळे तुमच्या मेंदूवर नकारात्मक परिणाम होऊन गोष्टी लगेच विसरणे, लक्षात ठेवण्याची क्षमता कमी होणे, आकलन क्षमता मंदावणे अशा समस्यांना सामोरे जावे लागते.
या समस्या पुढे गंभीर स्वरूप घेऊन अल्झायमरसारखे आजार होण्याची शक्यता असते. डोपामाईन हे मेंदूमधील एक असे रसायन आहे, जे मेंदूला उत्तेजित करण्याचे कार्य करते. रिल्स अॅडिक्शनमुळे तुमचा मेंदू उच्च-उत्तेजना या समस्येला बळी पडतो. ज्यामुळे चिंता, नैराश्य, न्यूनगंड अशा मानसिक समस्या उद्भवतात. सोशल मीडियावरील या रिल्समध्ये काल्पनिक जीवनशैली, सौंदर्य, स्टायलीश राहणीमान अशाप्रकारचा मजकूर दाखवणारे व्हिडीओज असतात. या रिल्स सतत पाहिल्याने तुम्ही तुमच्या सामान्य जीवनशैलीची आणि स्वतःची तुलना करू लागता. यामुळे तुमच्या मनात तुम्ही जीवनाच्या इतर क्षेत्रात तुमच्या पूर्ण क्षमतेनुसार कामगिरी करण्यास असमर्थ असण्याची भावना निर्माण होऊ शकते.
तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार सतत रिल्स पाहिल्याने झोपेची गुणवत्ता कमी होते. मोबाईल स्क्रीनची ब्ल्यू-रेज आणि मेंदूची सतत चालू असलेली जागरूकता यामुळे झोप उशिरा लागते आणि सकाळी थकवा जाणवतो. इतकेच नाही तर वारंवार माहितीची भर पडल्यामुळे अल्पकालीन स्मृतीवरही परिणाम होऊ शकतो. रिल्स अॅडिक्शन टाळण्यासाठी रिल्स पाहण्याच्या मर्यादित वेळा ठरवा, झोपेच्या आधी सोशल मीडियाचा वापर टाळा आणि दिवसातून एकदा तरी डिजिटल डिटॉक्स करा. नवीन सामग्री तपासण्याचा मोह टाळण्यासाठी सोशल मीडियाचे नोटिफिकेशन बंद करून ठेवा, तुमचा रिकामा वेळ घालवण्यासाठी मोबाईल व्यतिरिक्त इतर साधनांचा उपयोग करा.