नवी दिल्ली : आर्टिफिशियल इंटेलिजेंस (एआय) आणि आधुनिक तंत्रज्ञानाने आपले जीवन सुसह्य केले आहे. बँकिंग, शॉपिंग, ऑफिसची कामे असो किंवा शिक्षण, सर्व काही आता एका क्लिकवर किंवा व्हॉइस कमांडवर उपलब्ध आहे. आरोग्य क्षेत्रातही एआय भविष्यातील एक मोठी आशा म्हणून पाहिले जात आहे. मात्र, या चकाकीच्या मागे एक काळी बाजूदेखील आहे. आरोग्य तज्ज्ञांनी इशारा दिला आहे की, एआय चॅटबॉटस्चा अतिवापर लोकांच्या मानसिक आरोग्यासाठी घातक ठरू शकतो.
नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणात 21,000 पेक्षा जास्त लोकांनी सहभाग घेतला होता. यामध्ये असे आढळले की, जे लोक एआय तंत्रज्ञानावर जास्त अवलंबून आहेत किंवा त्याचा अतिवापर करतात, त्यांच्यामध्ये तणाव, चिंता, चिडचिडेपणा आणि नैराश्याचा धोका इतरांपेक्षा कितीतरी जास्त आहे. ‘जामा नेटवर्क’ या जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या या अभ्यासासाठी एप्रिल आणि मे 2025 मध्ये माहिती गोळा करण्यात आली होती. यामध्ये 18 वर्षांवरील व्यक्तींचा समावेश होता. वापराचे प्रमाण : 10.3 टक्के लोक दररोज एआय वापरतात, तर 5.3 टक्के लोक दिवसातून अनेक तास याचा वापर करतात.
दररोज वापर करणार्यांपैकी निम्मे लोक कामासाठी, 11.4 टक्के शिक्षणासाठी, तर 87.1 टक्के लोक वैयक्तिक कारणांसाठी ‘एआय’ ची मदत घेतात. दररोज एआय वापरणार्या लोकांमध्ये नैराश्याचा धोका इतर लोकांच्या तुलनेत 30 टक्क्यांनी जास्त असल्याचे शास्त्रज्ञांना आढळले आहे. हार्वर्ड मेडिकल स्कूलमधील मानसोपचार तज्ज्ञ रॉय एच. पर्लिस यांच्या मते, ‘नैराश्यातील वाढ ही थेट ‘एआय’मुळे आहे की जे लोक आधीच नैराश्यात आहेत ते मदतीसाठी ‘एआय’कडे वळत आहेत, हे शोधणे कठीण आहे. मानसिक समस्या असलेले लोक आधार मिळवण्यासाठी ‘एआय’ चा अधिक वापर करू शकतात.
1. बौद्धिक क्षमतेवर परिणाम : स्वतःचे डोके न वापरता सतत ‘एआय’ ची मदत घेतल्याने विचार करण्याची आणि निर्णय घेण्याची क्षमता कमी होऊ शकते.
2. सृजनशीलता कमी होणे : दीर्घकाळ ‘एआय’ वर अवलंबून राहिल्याने व्यक्तीची कल्पकता आणि कार्यक्षमता मंदावते.
3. नकारात्मक विचारांना खतपाणी : तज्ज्ञांच्या मते, चॅटबॉटस् कधीकधी वापरकर्त्याच्या भीती किंवा दुःखाच्या भावनांना क्लिनिकल सल्ल्याशिवाय दुजोरा देतात, ज्यामुळे नकारात्मक विचारांची मालिका अधिक गडद होऊ शकते.
4. भ्रम आणि आत्महत्येचे विचार : काही पुराव्यांवरून असे समोर आले आहे की, चुकीच्या पद्धतीने वापरलेले चॅटबॉटस् लोकांमध्ये गोंधळ निर्माण करू शकतात आणि टोकाच्या विचारांना चालना देऊ शकतात.