टेक्सास : सुमारे 6 कोटी 60 लाख वर्षांपूर्वी एका अवाढव्य लघुग्रहाने (अॅस्ट्रॉईड) पृथ्वीला धडक दिली आणि डायनासोरसह 75 टक्के सजीव सृष्टी नष्ट झाली. मात्र, या विनाशकारी घटनेनंतर पृथ्वीवर जीवसृृष्टीने किती वेगाने उभारी घेतली, याचा एक थक्क करणारा खुलासा शास्त्रज्ञांनी केला आहे. नव्या संशोधनानुसार, डायनासोरच्या विनाशानंतरच्या काळात उत्क्रांतीचा वेग ओव्हरड्राईव्ह मोडमध्ये होता.
सामान्यतः नवीन प्रजाती तयार होण्यासाठी लाखो वर्षांचा काळ लागतो. मात्र, युनिव्हर्सिटी ऑफ टेक्सासचे प्राध्यापक ख्रिस लोअरी यांच्या नेतृत्वाखालील टीमला असे आढळले की, लघुग्रहाच्या धडकेनंतर केवळ 2,000 वर्षांपेक्षा कमी कालावधीत प्लँक्टनच्या (समुद्रातील सूक्ष्मजीव) नवीन प्रजाती विकसित झाल्या. डायनासोर नष्ट झाल्यानंतर अवघ्या 6,000 वर्षांच्या आत प्लँक्टनच्या 10 ते 20 नवीन प्रजाती अस्तित्वात आल्या होत्या. भूगर्भीय काळाचा विचार करता हा वेग अत्यंत थक्क करणारा आहे.
लघुग्रहाच्या धडकेमुळे पृथ्वीवरील गाळाचे (सेडिमेंट) थर विस्कळीत झाले होते. त्यामुळे पारंपरिक पद्धतीने काळाचे मोजमाप करणे कठीण होते. यासाठी शास्त्रज्ञांनी हेलियम-3 या आयसोटोप मार्करचा वापर केला. हेलियम-3 अंतराळातून येतो आणि समुद्राच्या तळाशी साठणार्या गाळात स्थिर दराने जमा होतो. या पद्धतीमुळे शास्त्रज्ञांना पी. इग्युबिना यासारख्या सूक्ष्मजीवांच्या उत्त्पतीचा अचूक काळ शोधता आला, जो लघुग्रहाच्या धडकेनंतर 3,500 ते 11,000 वर्षांच्या दरम्यान होता.
पेन स्टेट युनिव्हर्सिटीचे सह-लेखक टिमोथी ब्रालोव्हर यांच्या मते, हा शोध जीवसृष्टी किती लवचिक आहे हे सिद्ध करतो. भूगर्भीयद़ृष्टीने एका क्षणार्धात जटिल जीवसृष्टी पुन्हा प्रस्थापित होणे ही खरोखरच अद्भुत गोष्ट आहे. हे संशोधन केवळ भूतकाळातील विनाशाची माहिती देत नाही, तर मानवनिर्मित हवामान बदलामुळे सध्या धोक्यात असलेल्या प्रजातींमध्येही पुन्हा उभारी घेण्याची क्षमता असू शकते, अशी आशा निर्माण करते.