File Photo
विश्वसंचार

तुतानखामेनच्या मकबर्‍यात ‘ओसिरिस जागृती’ विधीचे पुरावे

पुढारी वृत्तसेवा

कैरो : येल विद्यापीठातील इजिप्तोलॉजिस्ट डॉ. निकोलस ब्राऊन यांच्या मते, प्रसिद्ध इजिप्शियन राजा तुतानखामेनच्या मकबर्‍यात प्राचीन विधी ‘ओसिरिस जागृती’ पार पाडल्याचे पहिलेच पुरावे सापडले आहेत. डॉ. ब्राऊन यांनी ‘द जर्नल ऑफ इजिप्शियन आर्कियोलॉजी’मध्ये प्रकाशित संशोधनात नमूद केले की, संपूर्ण मकबर्‍याची रचना या विधीसाठीच करण्यात आली होती. ओसिरिस हा इजिप्शियन लोकांचा मृत्यूदेवता होता. पुराणकथेनुसार त्याचा भाऊ सेथ याने त्याचा वध केला; परंतु त्याचा मुलगा होरस याने आपल्या जादुई काठीच्या साहाय्याने त्याला पुन्हा जिवंत केले.

डॉ. ब्राऊन यांच्या म्हणण्यानुसार, तुतानखामेनच्या मकबर्‍यात चार मातीचे वाडगे आणि चार लाकडी काठ्या सापडल्या. हे वाडगे पाण्याने भरून तुतानखामेनच्या ममीवर किंवा जवळपास ओतले गेले असण्याची शक्यता आहे, तर या काठ्या होरसच्या जादुई काठीचे प्रतीक असू शकतात. पाणी हे इजिप्शियन धर्मशास्त्रात अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. प्राचीन पिरॅमिड ग्रंथांमध्ये नमूद केल्याप्रमाणे हे द्रव मृतदेहाला नवजीवन देण्याचे कार्य करत असे. विशेषतः, नाईल नदीचे पाणी ‘होरसचे नेत्र’ म्हणून ओळखले जात असे आणि ते पुनरुत्थान व अंधकारावर विजय मिळविण्याचे प्रतीक होते. समाधीगृहातील चार वाडगे व चार काठ्या चार दिशांचे प्रतीक असून त्या मृत राजाच्या संरक्षणासाठी वापरण्यात आल्या असाव्यात, असे ब्राऊन यांनी सांगितले. तुतानखामेनचे वडील, राजा अखेनातेन यांनी पारंपरिक इजिप्शियन धर्म विसरून केवळ अतेन (सूर्याच्या प्रकाशाचे दैवत) याची पूजा करण्यावर भर दिला होता. त्यांनी इतर देवतांची नावे व मूर्ती नष्ट करण्याचा आदेशही दिला होता. त्यामुळे ओसिरिसच्या पुनर्जन्माशी संबंधित धार्मिक विधींवर बंदी होती. डॉ. ब्राऊन यांच्या मते, तुतानखामेनच्या मृत्यूनंतर त्याच्या समाधीगृहात पारंपरिक ओसिरिस विधी पार पडला असावा, ज्यामुळे पूर्वीच्या धार्मिक परंपरांना पुनर्स्थापित करण्याचा प्रयत्न झाला असावा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT