प्रयागराज : आपल्या देशात ज्या चार ठिकाणी कुंभमेळा भरतो, त्यापैकी एक ठिकाण म्हणजे प्रयागराज. रामायण किंवा पुराणांमध्येही ज्या भूमीचे आणि तेथील त्रिवेणी संगमाचे वर्णन आढळते ते हे पवित्र तीर्थस्थळ. या ठिकाणी गंगा, यमुना आणि सरस्वती या तीन पवित्र नद्यांचा संगम होत असल्याने ते सर्व भाविकांसाठी अतिशय महत्त्वाचे तीर्थस्थळ बनले. काळाच्या ओघात प्राचीन सरस्वती नदीचा प्रवाह लुप्त झाला. मात्र, तिचे प्रयागराजच्या त्रिवेणी संगमामध्ये खरोखरच अस्तित्व होते याचे पुरावे आता शोधण्यात आले आहेत. हैदराबादच्या CSIR- National Geophysical Research Institute ( NGRI) मधील संशोधकांनी याबाबतचे महत्त्वाचे संशोधन केले आहे.
एका अतिशय आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत गंगा आणि यमुना नदीच्या दरम्यान एका प्रचंड मोठ्या नदीचे (पेलियो रिवर) अस्तित्व त्यांनी शोधले आहे. ज्यामुळे या संगमाबाबत असणार्या मान्यतांना आणखी आधार मिळाला आहे. संशोधनातून समोर आलेल्या माहितीनुसार जमिनीखाली लुप्त झालेली नदी म्हणजेच पॅलयो चॅनल 4 ते 5 किलोमीटर इतकी रुंद असून, हे पात्र गंगा आणि यमुना इतकंच मोठं आहे. या नदीपात्राची खोली आणि आधार स्तर दोन्ही नद्यांसमान असून, त्यातून सिद्ध होत आहे की, ही एक वेगळीच नदी असून, हे पात्र म्हणजे गंगा आणि यमुना नदीची दुसरी वाट नव्हे.
या नदीची वळणंही दिसली असून, ती गंगा आणि यमुना नदीशीच वाहत होती हे सिद्ध होत आहे. संशोधनातून प्रारंभिक स्तरावर मिळालेल्या माहितीनुसार 45 कि.मी. लांबीच्या पात्राची माहिती मिळाली असून, त्यानंतर ‘नॅशनल मिशन फॉर क्लिन गंगा’च्या सहकार्यानं ते वाढवून कानपूरपर्यंत साधारण 200 कि.मी. करण्यात आलं. पुढे ही नदी पश्चिम आणि हिमालयापर्यंत पसरली असू शकते, असाही संशोधकांचा अंदाज आहे. मूळ संगमापासून साधारण 25 कि.मी.च्या अंतरावर या नदीचं अस्तित्व सापडलं असून, या संपूर्ण संशोधनामध्ये वाढलेली लोकसंख्या, विजेच्या तारा आणि इमारतींमुळं सर्वेक्षणात अनेक अडचणी आल्या.
काळानुरूप नदीच्या पात्रानं वाट बदलल्याचंसुद्धा या सर्वेक्षणातून सिद्ध झालं. या नदीत अंशत: पाणी असून, ती अंशत: कोरडीसुद्धा आहे. आपापसातच एकरूप झालेल्या एक्वीफर सिस्टीमचाच भाग असणारी ही नदी गंगा आणि यमुनेशी जोडलेली आहे. ज्यामुळं भूजलपातळीत वाढ होण्यास हातभार लागतो. गंगा नदीच्या मैदानी क्षेत्रामध्ये भूजलसाठा मोठ्या वेगानं कमी होत असताना दिसत असल्यानं या प्राचीन नदीपात्राच्या मदतीनं पावसाचं पाणी आणि भूपृष्ठावरील पाणी भूगर्भात संचयित केलं जाऊ शकतं. यामुळं उन्हाळ्याच्या दिवसांमध्येही नद्यांचा जलस्तर वाढून भूजल गुणवत्ता आणि पातळी सुधारेल.
हीच आहे का सरस्वती नदी?
दोन नद्यांच्या पात्रामध्ये दडलेली ही नदी, तिचं मूळ स्थान आणि आकाराच्या वर्णनात आणि प्राचीन सरस्वती नदीत बरंच साधर्म्य असून, संगमाजवळच असणारं तिचं अस्तित्व मान्यतांना आणखी बळ देत आहे. परिणामी, आता प्रयागराज इथं असणारं संगम हे फक्त तीर्थक्षेत्र राहिलं नसून, ते भूसंशोधन आणि आधुनिक विज्ञानाच्या संगमाचंही ठिकाण ठरत आहे. NGRI च्या या संशोधनातून हीच बाब अधोरेखित होत आहे की, गंगा आणि यमुना नदीसमवेत इथं एक तिसरी नदीसुद्धा वाहत होती; मात्र काळाच्या ओघात ती भूगर्भात लुप्त झाली.