न्यूयॉर्क : एके काळी पृथ्वीवर विविध प्रजातींच्या डायनासोरचेच साम्राज्य होते. मात्र, 6.6 कोटी वर्षांपूर्वी अचानक या साम्राज्याचा अंत झाला. त्यावेळी एका लघुग्रहाची पृथ्वीला धडक झाली आणि त्यामुळे पृथ्वीवरील 75 टक्के जीवसृष्टीचा र्हास झाला असे मानले जाते. आता या धडकेचे पुरावे सापडले आहेत. चिक्सलब क्रेटर या नावाने ओळखले जाणारे विवर याच धडकेने निर्माण झाले होते. तिथेच त्याचे पुरावे सापडले आहेत.
टेक्सास युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी याबाबतचे संशोधन केले आहे. त्यांनी म्हटले आहे की मेक्सिकोतील या विवरात सापडलेल्या लघुग्रहाच्या धुळीने हे सिद्ध केले आहे की कोट्यवधी वर्षांपूर्वी डायनासोरचा अंत एका लघुग्रहाच्या धडकेनेच झाला होता. स्टीव्हन गोडेरिस या संशोधकाने सांगितले की विवरातील खडकांमध्ये मोठ्या प्रमाणात इरिडियम सापडले आहे. ते पृथ्वीवर अन्यत्र मिळणे अतिशय दुरापास्त गोष्ट आहे. हे काही लघुग्रहांमध्येच सापडते. त्यावरून असे दिसते की चिक्सलब विवर एका लघुग्रहाच्या धडकेनेच बनले होते व याच धडकेने डायनासोर नष्ट झाले. 11 ते 81 किलोमीटर व्यासाच्या लघुग्रहाच्या धडकेने हे विवर बनले असावे असा अंदाज आहे.