विश्वसंचार

भारताबाहेरील दोन हजार वर्षांपूर्वीच्या ‘करी’चे पुरावे

Arun Patil

कॅनबेरा : वेगवेगळ्या प्रकारच्या मसाल्यांशिवाय आपण जेवणाची कल्पनाही करू शकत नाही. केवळ आपल्याकडेच नव्हे तर चिनी, व्हिएतनामी, मलेशियन, श्रीलंकन अशा अनेक देशांमध्ये मसाल्यांचा वापर केला जातो. आता एका नव्या संशोधनातून असे दिसून आले आहे की पाककलेसाठी मसाल्यांचा व्यापार अतिशय जुना आहे. हा व्यापार दोन हजार वर्षांपूर्वीपासूनचा असल्याचे दिसून आले आहे. भारताबाहेरही मसालेदार 'करी' बनवली जात होती याचे पुरावे यानिमित्ताने आढळले आहेत. दोन हजार वर्षांपूर्वीच्या दगडी पाट्यावरील अवशेषांमध्येही मसाल्यांचे अवशेष आढळले आहेत.

'सायन्स अडव्हान्सेज' या नियतकालिकात याबाबतच्या संशोधनाची माहिती देण्यात आली आहे. त्यामध्ये भारताबाहेरील करीच्या सर्वात जुन्या पुराव्यांची माहिती आहे. दक्षिण व्हिएतनाममधील ओसी ईओ पुरातत्त्व परिसरात विभिन्न स्रोतांमधून आठ अद्वितीय मसाले सापडले. त्यांचा वापर त्या काळी मसालेदार आमटी किंवा ग्रेव्हीची भाजी करण्यासाठी होत होता. यापैकी काही मसाले सागरी वाहतुकीच्या मार्गाने हजारो किलोमीटर अंतरावरून तिथे पोहोचले होते. प्राचीन फनान साम्राज्यातील लोक असे मसाले बारीक करण्यासाठी दगडी पाट्याचाही वापर करीत असत. ओसी ईओ साईटवरील उत्खननात अशा मसाले कुटण्याच्या दगडी साहित्यांची एक श्रुंखला मिळाली होती. त्यावरील सूक्ष्म अवशेषांचेही विश्लेषण करण्यात आले.

ज्या 40 उपकरणांचे विश्लेषण करण्यात आले त्यापैकी बारा उपकरणांमध्ये हळद, आले, फिंगररूट, लवंग, जायफळ, दालचिनी यासह अन्यही काही मसाल्यांचे अवशेष दिसून आले. सर्वात मोठ्या पाट्याच्या खाली असलेल्या कोळशाच्या नमुन्यावरून त्याचा कालावधी निश्चित करण्यात आला. तो इसवी सनपूर्व 207 ते 326 हा असल्याचे दिसून आले. या दगडी पाट्याचे माप 76 सेंटीमीटर लांब व 31 सेंटीमीटर रुंद आहे. या संशोधनावरून दिसून येते की मसाले हे दोन हजार वर्षांपूर्वीच्याही वैश्विक व्यापारातील आदान-प्रदानाची मौल्यवान वस्तू होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT