विश्वसंचार

दरवर्षी 5 हजार उल्का बुडू शकतात अंटार्क्टिकाच्या बर्फात : संशोधकांचा इशारा

Arun Patil

वॉशिंग्टन : पृथ्वीवर नेहमी उल्कांचा वर्षाव होत असतो. अशा उल्का परग्रहाचा तुकडाही असू शकतात. त्यांच्या अभ्यासातून संबंधित ग्रहांच्या भूरचनेचा अभ्यास होत असतो. त्यामुळे व अन्यही अनेक कारणांमुळे या उल्का महत्त्वाच्या ठरत असतात. सध्या जागतिक तापमानवाढीमुळे अंटार्क्टिकामधील बर्फ वितळत आहे. या खंडामध्ये पडणार्‍या उल्का अशा बर्फाच्या पृष्ठभागावर न राहता तो वितळत चालल्याने आत बुडून जाऊ शकतात. दरवर्षी सुमारे 5 हजार उल्का अंटार्क्टिकाच्या बर्फात बुडू शकतात, असा इशारा संशोधकांनी दिला आहे. या उल्का अशा कायमस्वरूपी या बर्फाच्या आवरणाखाली गेल्यास, त्यांच्यामधून मिळणार्‍या माहितीला आपण कायमचे मुकू, असे संशोधकांना वाटते.

येत्या काही दशकांमध्ये अशा बहुतांशी उल्का अंटार्क्टिकाच्या बर्फाखाली कायमच्या गडप होऊ शकतात, असे एका नव्या संशोधनात म्हटले आहे. त्यामुळे या उल्का बर्फाच्या आवरणाखाली जाण्यापूर्वीच त्यांचा शोध घेणेही गरजेचे आहे. लाखो वर्षांपासून या दक्षिण ध्रुवावर मोठ्या प्रमाणात उल्कापात होत आलेला आहे. यापैकी अनेक उल्का यापूर्वीच बर्फात खोलवर गेलेल्या आहेत. त्या आता पुन्हा दृष्टीस पडणे कठीण आहे. तथापि, या खंडाच्या काही विशिष्ट भागांमध्ये, ज्यांना 'ब्ल्यू आईस एरियाज' असे म्हटले जाते, तिथे अशा उल्का बर्फाच्या जणू काही पिंजर्‍यापासून मुक्त झालेल्या असतात.

याठिकाणी गोठलेल्या पाण्याचा वरचा स्तर सूर्यकिरणांमुळे वितळतो व वार्‍यामुळे या उल्का वर येतात. काही उल्का अशा ठिकाणी हजारो वर्षांपासून अडकलेल्या असू शकतात. उल्कांच्या शोधासाठी अंटार्क्टिकामधील हा 'ब्ल्यू आईस एरिया' नंदनवनच ठरलेला आहे. अशी 600 ठिकाणे अंटार्क्टिकामध्ये आहेत. अंटार्क्टिकामध्ये आतापर्यंत सुमारे 50 हजार उल्का सापडलेल्या आहेत. जगभरातून गोळा केलेल्या उल्कांपैकी हे प्रमाण 60 टक्के आहे. त्यापैकी बहुतांश उल्का एक इंचापेक्षा कमी व्यासाच्या आहेत. मात्र, काही उल्का मोठ्या आकाराच्याही आहेत. जानेवारी 2023 मध्ये तिथे तब्बल 7.7 किलो वजनाची उल्का सापडली होती. या खंडावर सापडलेल्या सर्वात वजनदार उल्कांपैकी ही एक आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT