विश्वसंचार

रोज कोट्यवधी खर्च केले तरी संपणार नाही ‘यांची’ संपत्ती!

Arun Patil

वॉशिंग्टन : जगातील श्रीमंत व्यक्तींची यादी दरवर्षी जाहीर केली जाते. या यादीनुसार गेल्या चार वर्षांत श्रीमंत व्यक्तींच्या संपत्तीत रॉकेटच्या वेगाने वाढ झाली आहे. अमेरिकेतल्या 'ऑक्सफॅम' इंटरनॅशनल संस्थेने दिलेल्या अहवालानुसार 2020 पासून आतापर्यंत जगातील पाच अब्जाधीशांच्या संपत्तीत तब्बल 114 टक्के वाढ झाली आहे. 2020 नंतर जगाने खूप चढ-उतार पाहिले. कोव्हिड महामारीपासून युक्रेन-रशिया युद्ध, इस्रायल-हमास युद्ध, या घटनांनी जगाच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला.

अनेक लोकांच्या नोकर्‍या गेल्या. जी काही बचत केली होती, ती संपली. मोठमोठ्या कंपन्या बंद झाल्या. याचा परिणाम असा झाला, गरीब आणखी गरीब झाले, तर श्रीमंत गडगंज श्रीमंत झाले. 2020 पासून आतापर्यंत जगातील पाच श्रीमंत व्यक्तींच्या संपत्तीत मात्र प्रचंड वाढ झाली. रोज आठ कोटी रुपये खर्च केले, तरी त्यांचे पैसे संपण्यासाठी पाचशे वर्षे लागतील!

ऑक्सफॅम इंटरनॅशनल संस्थेच्या अहवालानुसार ज्या अब्जाधीशांची संपत्ती वाढली आहे, त्यात एलन मस्क, बर्नाड अनॉल्ट, जेफ बेजोस, लॅरी एलिसन आणि मार्क झुकेरबर्ग या उद्योगपतींचा समावेश आहे. या अब्जाधीशांची संपत्ती तब्बल 114 टक्क्यांनी वाढली आहे. ऑक्सफॅम इंटरनॅशनल संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, या पाच उद्योगपतींची संपत्ती 2020 नंतर 405 अब्ज अमेरिकी डॉलरवरून 869 अब्ज अमेरिकी डॉलर म्हणजे भारतीय रुपयांत 72 लाख करोड रुपये, इतकी वाढली आहे.

हे अब्जाधीश प्रत्येक तासाला 116 कोटी रुपयांहून अधिकची कमाई करताहेत. श्रीमंतांच्या संपत्तीच्या वाढीचा वेग असाच राहिला, तर पुढच्या 10 वर्षांत जगात खरबपती तयार होतील. जगातील 148 कंपन्यांनी 1800 अब्ज अमेरिकी डॉलरचा नफा कमावला. जगातील सर्वात श्रीमंत असलेल्या 1 टक्का लोकांकडे तब्बल 43 टक्के संपत्ती आहे.

SCROLL FOR NEXT