Identical twins: जुळ्या मुलांच्या बोटांचे ठसेही असतात वेगवेगळे! Pudhari
विश्वसंचार

Identical twins: जुळ्या मुलांच्या बोटांचे ठसेही असतात वेगवेगळे!

आपल्या हाताच्या आणि पायाच्या बोटांच्या त्वचेवर असलेल्या नैसर्गिक रेषांना आपण ‌‘फिंगरप्रिंट‌’ (बोटांचे ठसे) म्हणतो

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली : आपल्या हाताच्या आणि पायाच्या बोटांच्या त्वचेवर असलेल्या नैसर्गिक रेषांना आपण ‌‘फिंगरप्रिंट‌’ (बोटांचे ठसे) म्हणतो. या उंचावलेल्या रेषांना ‌‘रिज‌’ (ठळवसशी) म्हटले जाते आणि त्यांच्यामधील अंतर मिळून एक विशिष्ट डिझाईन तयार होते. हेच पॅटर्न प्रत्येक व्यक्तीची स्वतंत्र ओळख बनतात. अगदी जुळ्या मुलांचे बोटाचे ठसेही वेगवेगळेच असतात. विशेष म्हणजे, हे पॅटर्न आयुष्यभर बदलत नाहीत, म्हणूनच त्यांना ओळखीचा सर्वात विश्वसनीय मार्ग मानले जाते.

बोटांचे ठसे जन्मापासून मृत्यूपर्यंत साधारणपणे सारखेच राहतात. जर त्वचेला किरकोळ दुखापत झाली, तरी ती बरी झाल्यावर जुनाच पॅटर्न पुन्हा येतो. याचे कारण असे की, फिंगरप्रिंट त्वचेच्या वरच्या थरावर नसून खोल थरांमध्ये तयार झालेले असतात. जोपर्यंत त्वचेच्या आतील थराला गंभीर इजा होत नाही, तोपर्यंत बोटांचे ठसे कायमस्वरूपी राहतात. फिंगरप्रिंटस्‌‍चा विकास गर्भधारणेच्या साधारणपणे 10 व्या आठवड्यापासून सुरू होतो. जेव्हा बाळ आईच्या गर्भात वाढत असते, तेव्हा त्याचे हात आजूबाजूच्या पृष्ठभागाला आणि द्रवाला स्पर्श करत असतात. याच काळात त्वचेचा विकास वेगाने होत असतो.

हातांची हालचाल, दाब आणि विकासाचा वेग या सर्वांच्या मिश्रणातून प्रत्येक बोटावर एक अनोखा ‌‘रिज पॅटर्न‌’ तयार होतो. याच कारणामुळे प्रत्येक व्यक्तीचे फिंगरप्रिंट वेगळे असतात. एकच ‌‘डीएनए‌’ असलेल्या जुळ्या मुलांचे फिंगरप्रिंटस्‌‍देखील वेगळे का असतात, हा प्रश्न अनेकांना थक्क करतो. याचे उत्तर असे की, जनुके केवळ एक मूलभूत आराखडा तयार करतात; पण प्रत्येक सूक्ष्म तपशिल नियंत्रित करत नाहीत. गर्भातील बाळाची स्थिती, रक्ताभिसरण, त्वचेच्या वाढीचा वेग आणि हालचाल यांसारखे सूक्ष्म घटक अंतिम पॅटर्नवर परिणाम करतात. या लहानशा फरकांमुळेच जुळ्या मुलांचे ठसेही वेगवेगळे असतात.

बोटांच्या ठशांचे प्रामुख्याने तीन प्रकारांत वर्गीकरण केले जाते : 1. लूप : हा सर्वात सामान्य प्रकार आहे, यात रेषा एका बाजूने प्रवेश करून वळतात आणि त्याच बाजूने बाहेर पडतात. 2. व्हर्ल : हे गोलाकार किंवा सर्पिल आकाराचे असतात, जे लहान भोवऱ्यासारखे दिसतात. 3. आर्च ( अीलह) : हे मध्यभागी लहान टेकडीसारखे वर येतात आणि दुसऱ्या बाजूला उतार तयार करतात. बहुतेक लोकांचे फिंगरप्रिंटस्‌‍ या तिन्ही पॅटर्नच्या मिश्रणातून बनलेले असतात.

फिंगरप्रिंटस्‌‍ केवळ ओळखीचे माध्यम नाहीत, तर ते आपली पकड मजबूत करण्यासही मदत करतात. बोटांवरील या रेषा घर्षण निर्माण करतात, ज्यामुळे आपल्याला मोबाईल, पेन किंवा कप यांसारख्या वस्तू सहज पकडता येतात. तसेच, यामुळे आपली स्पर्शसंवेदना सुधारते, ज्यामुळे आपण कोणत्याही पृष्ठभागाचा पोत अधिक स्पष्टपणे अनुभवू शकतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT