Europe Starlink Challenge | 'स्टारलिंक'ला युरोपचे मोठे आव्हान 
विश्वसंचार

Europe Starlink Challenge | 'स्टारलिंक'ला युरोपचे मोठे आव्हान

युटेलसॅटची २२९ नव्या उपग्रहांची ऑर्डर

अरुण पाटील

लंडन : उपग्रह क्षेत्रातील अग्रगण्य फ्रेंच-ब्रिटिश ऑपरेटर युटेलसॅटने आपल्या वनवेब नेटवर्कच्या विस्तारासाठी गुरुवारी मोठी घोषणा केली. कंपनीने विमान व अंतराळ तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज कंपनी एअरबससोबत २२९ अतिरिक्त लो-अर्थ ऑर्बिट उपग्रहांसाठी नवा करार केला आहे. या करारांतर्गत युटेलसॅट २०३४ पर्यंत आपले जाळे अधिक मजबूत आणि अद्ययावत करणार असून, यासाठी तब्बल १ अब्ज युरो (सुमारे १.१६ अब्ज डॉलर्स) एवढी गुंतवणूक करण्यात येणार आहे.

सध्या जागतिक पातळीवर उपग्रह इंटरनेट क्षेत्रात एलन मस्क यांच्या 'स्टारलिंक'चा वरचष्मा आहे. स्टारलिंककडे सध्या कक्षेत ११,००० हून अधिक उपग्रह सक्रिय आहेत. या मक्तेदारीला आव्हान देण्याचा युटेलसॅटचा मानस आहे. युटेलसॅटने वनवेबसोबत केलेल्या ३.४ अब्ज डॉलर्सच्या विलीनीकरणानंतर आलेल्या आर्थिक दबावातून सावरण्यासाठी सुमारे ५ अब्ज युरोचा निधी उभारला होता. आता कंपनीने आपल्या पायाभूत सुविधांच्या विस्तारावर भर दिला आहे.

फ्रेंच आणि ब्रिटिश सरकारांसाठी युटेलसॅट धोरणात्मकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. कारण स्टारलिंकच्या व्यतिरिक्त सुरक्षित सरकारी दळणवळण आणि ब्रॉडबँड इंटरनेट सेवा पुरवणारे हे एकमेव लो-अर्थ ऑर्बिट नेटवर्क आहे. वनवेबकडे सध्या ६०० हून अधिक उपग्रह कार्यरत आहेत. युटेलसॅटचे मुख्य कार्यकारी अधिकारी जीन-फ्राँस्वा फलाशेर यांनी मार्चमध्ये स्पष्ट केले होते की, त्यांच्या उपग्रहांची संख्या लवकरच १,००० च्या पुढे जाईल.

स्टारलिंकच्या तुलनेत वनवेबला जागतिक कव्हरेजसाठी कमी उपग्रहांची आवश्यकता भासते; कारण हे उपग्रह अधिक उंचीवरून कार्यरत असतात. याशिवाय, सामान्य ग्राहकांऐवजी सरकारी संस्था, कॉर्पोरेट उद्योग आणि टेलिकॉम ऑपरेटर यांच्यावर वनवेबचा मुख्य भर असतो.

कंपनीने २०२४ आणि २०२५ मध्ये ४४० एअरबस उपग्रहांची मागणी नोंदवली होती, ज्यांची डिलिव्हरी चौथ्या तिमाहीत सुरू होण्याची शक्यता आहे. या आधीच्या ४४० उपग्रहांसाठी कंपनीने २०३० पर्यंत सुमारे २ अब्ज युरो खर्च करण्याचे नियोजन केले होते. ताज्या करारामुळे हा विस्तार थेट २०३४ पर्यंत वाढवला गेला आहे. हे नवे २२९ उपग्रह युरोपीय युनियनच्या नियोजित ‘आयआएएस २’ या ३४८ उपग्रहांच्या सुरक्षित दळणवळण प्रणालीचे व्यावसायिक काम सुरू होईपर्यंत सेवेमध्ये सातत्य राखण्याचे काम करतील. ‘आयआएएस २’ प्रणाली दशकाच्या अखेरीस सक्रिय होण्याची अपेक्षा आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT