‘प्रोबा-3’ कृत्रिम सूर्यग्रहणही घडवणार आहे. Pudhari File Photo
विश्वसंचार

Proba-3 Mission : ‘प्रोबा-3’ घडवणार कृत्रिम सूर्यग्रहण

5 डिसेंबरला ‘प्रोबा-3’ मोहिमेतील दोन उपग्रहांचे प्रक्षेपण करण्यात आले

पुढारी वृत्तसेवा

बंगळूर : नुकतेच म्हणजे 5 डिसेंबरला ‘प्रोबा-3’ मोहिमेतील दोन उपग्रहांचे प्रक्षेपण करण्यात आले. हे ‘प्रोबा-3’ कृत्रिम सूर्यग्रहणही घडवणार आहे. अर्थात हा प्रकार केवळ तीव्र सूर्यप्रकाशाला ब्लॉक करून सूर्याचा कोरोना स्पष्टपणे पाहण्यासाठी केला जाईल.

सूर्यग्रहण ही एक खगोलीय घटना आहे. सूर्यग्रहण वर्षातून एक किंवा दोन वेळा होत असतं. मात्र, आता वैज्ञानिक असे कृत्रिम सूर्यग्रहण करण्याच्या तयारीत आहे. या प्रकल्पाला भारतीय शास्त्रज्ञांनी देखील मदत केली आहे. कृत्रिम सूर्यग्रहणासाठी परिस्थिती निर्माण करण्याच्या उद्देशाने युरोपियन स्पेस एजन्सीने (ईएसए) प्रथमच दोन उपग्रह अंतराळात यशस्वीरित्या पाठवले आहेत. प्रोबा-3 (प्रोजेक्ट फॉर ऑन-बोर्ड ऑटोनॉमी) असे या मोहिमेचे नाव आहे. भारताच्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून पीएसएलव्ही-सी 59 रॉकेटच्या साहाय्याने 5 डिसेंबर रोजी या उपग्रहांचे प्रक्षेपण करण्यात आलं होतं. या मोहिमेचा मुख्य उद्देश ‘परफेक्ट फॉर्मेशन फ्लाईंग‘ (पीएफएफ) तंत्राचे प्रात्यक्षिक करणं व सूर्याच्या कोरोनाच्या (कड्यांचा) बाह्य वातावरणाचा अभ्यास करणे हा आहे. सूर्याच्या पृष्ठभागाचे सरासरी तापमान सुमारे 5,500 अंश सेल्सिअस आहे, परंतु याउलट कोरोनाचे तापमान 1 दशलक्ष ते 3 दशलक्ष अंश सल्सिअसपर्यंत पोहोचू शकते. हा विरोधाभास शास्त्रज्ञांपुढं मोठं गूढ आहे. ‘प्रोबा-3’ च्या माध्यमातून शास्त्रज्ञ कोरोनाचे तापमान सूर्याच्या पृष्ठभागापेक्षाही इतके जास्त का आहे? तसेच या भागात कोणत्या घडामोडी घडतात हे समजून घेण्याचा प्रयत्न या मोहिमेच्या माध्यमातून करणार आहेत.

कोरोनातून येणारे सोलर फ्लेअर्स पृथ्वीवर पोहोचू शकतात आणि त्याचा परिणाम अंतराळातील हवामानावर होऊ शकतो, ज्यामुळे उपग्रह व पृथ्वीसंचालित विद्युत यंत्रणेत व्यत्यय येऊ शकतो. प्रोबा-3 मोहिमेत दोन उपग्रहांचा समावेश आहे. 1.कोरोनाग्राफ स्पेसक्राफ्ट आणि 2. ऑकल्टर स्पेसक्राफ्ट. ऑकल्टर स्पेसक्राफ्टमध्ये 140 सेंमी व्यासाची डिस्क आहे, जी सीएससीवर सावली टाकून सूर्याचा तेजस्वी प्रकाशाला अडवेल. हे दोन्ही उपग्रह पृथ्वीपासून 60,000 कि.मी. अंतरावर स्थापित करण्यात आले आहेत. 150 मीटरचे अचूक अंतर राखत सूर्याशी हे दोन्ही कृत्रिम उपग्रह समांतर ठेवण्यात आले आहेत. हा प्रयोग अचूक पद्धतीने केला जाणार आहे. या प्रक्रियेदरम्यान शास्त्रज्ञांना सहा तास सूर्याच्या कोरोनाचा अभ्यास करता येणार आहे, जो अभ्यास आतापर्यंत केवळ नैसर्गिक सूर्यग्रहणाच्या वेळीच करणे शक्य होते. प्रोबा-3 वरील उपकरणांमध्ये एएसपीआयसीएस नावाच्या कोरोनोग्राफचा समावेश आहे. हे खास उपकरण तीव्र सूर्यप्रकाशाला ब्लॉक करणार, जेणेकरून कोरोना स्पष्टपणे दिसू शकेल. सामान्य परिस्थितीत कोरोनाचा तीव्र प्रकाश सूर्याच्या पृष्ठभागापेक्षा लाखपट कमी असतो. असे असताना तो उघड्या डोळ्यांनी पाहणे अशक्य असते. ईएसएचे म्हणणे आहे की या मोहिमेमुळे अंतराळातील हवामानाचा अंदाज घेण्यास आणि सोलर वादळांचा प्रभाव समजण्यास मदत होणार आहे. ही मोहीम यशस्वी झाल्यास शास्त्रज्ञांना दर 19 तासांच्या कक्षीय चक्रात सहा तासांपर्यंत कोरोनाचा अभ्यास करता येणार आहे. त्यामुळे या अभ्यासाठी नैसर्गिक सूर्यग्रहणाची वाट पाहावी लागणार नाही. ही मोहीम अंतराळ संशोधनातील एक मोठे पाऊल असून भविष्यात वैज्ञानिकांना अनेक गोष्टींचा उलगडा होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT