पॅरिस : हिंडनबर्ग दुर्घटनेनंतर जवळपास एक शतकानंतर, एअरशिप्सचा सुवर्णकाळ संपला. परंतु, आता नवीन पिढीतील स्टार्टअप्स एअरशिप्सना गतवैभव प्राप्त करून देण्याच्या मोहिमेवर आहेत. अधिक सुरक्षित मटेरियल, प्रगत तंत्रज्ञान आणि शाश्वततेवर नव्याने लक्ष केंद्रित करून अमेरिका, बि-टन आणि फ्रान्समधील कंपन्या एअरशिप्सला विमाने आणि ट्रकच्या तुलनेत विशेषत: मालवाहतूक आणि हळू गतीच्या पर्यटनासाठी कमी कार्बन उत्सर्जन असलेला पर्याय म्हणून सादर करत आहेत, असे वृत्त आहे. फ्रेंच सरकारचे पाठबळ लाभलेल्या एका उपक्रमांतर्गत फ्लाईंग व्हेल 2029 पर्यंत 600 फूट लांबीच्या मालवाहू एअरशिप्स लाँच करण्याची योजना आखत आहे, जी 60 टनपर्यंत वजन वाहून नेऊ शकते.
1930 च्या दशकातील झेपेलिनमध्ये ज्वलनशील हायड्रोजन वापरला जात होता, त्याऐवजी आजचे प्रोटोटाईप्स ज्वलनशील नसलेल्या हेलियमचा वापर करतात आणि ते लाकूड आणि धातूऐवजी कार्बन फायबर आणि टायटॅनियमपासून बनलेले आहेत. एअरशिप कंपन्यांचे म्हणणे आहे की, त्यांच्या डिझाईनमुळे पारंपरिक विमानांच्या तुलनेत इंधनाचा वापर आणि कार्बन उत्सर्जन 90 टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकते. अनेक कंपन्या कार्यक्षम इंजिनांना बॅटरी पॉवरसोबत जोडतात, ज्यामुळे ते मालवाहू विमानांच्या तुलनेत खूपच कमी इंधन वापरू शकतात.
‘गुगल’चे सहसंस्थापक सर्गेई बि-न यांचे एलटीए रिसर्च त्यांच्या ‘पाथफायंडर वन’ची चाचणी करत आहे. ‘पाथफायंडर वन’ हे जगातील सर्वात मोठे विमान आहे, त्याची लांबी 400 फूट आहे आणि त्यांची महत्त्वाकांक्षा व्यावसायिक वापरासाठी ते वाढवण्याची आहे. यू.के. मध्ये हायबि-ड एअर व्हेईकल्स 300 फूट लांबीच्या एअरशिप्सचा ताफा तयार करत आहे, ज्यात विमाने आणि ब्लिम्प्सची वैशिष्ट्ये एकत्रित आहेत. दरम्यान, एअरशिपचे इतिहासकार जॉन जे. जिओघेगन म्हणतात की, डिझाईन तांत्रिकद़ृष्ट्या प्रभावी आणि हवामानासाठी अनुकूल असले तरी, व्यावसायिक व्यवहार्यतेचा मोठा अडथळा आहे.
स्टार्टअप्सचा युक्तिवाद आहे की, ते लॉजिस्टिक स्वीट स्पॉटला लक्ष्य करत आहेत - विमानांपेक्षा स्वस्त, ट्रकपेक्षा वेगवान. एअरशिप्सची कमाल गती सुमारे प्रतितास 80 मैल इतकी आहे, त्यामुळे ज्या मालाला जेट वेगाने हलवण्याची गरज नाही किंवा रस्ते किंवा धावपट्टी नसलेल्या भागात पोहोचण्याची गरज नाही, अशा मोठ्या मालाची वाहतूक ते करू शकतात. उदाहरणार्थ, फ्लाईंग व्हेलने सुरुवातीला दुर्गम जंगलातून लाकूड वाहतूक करण्यासाठी हे तंत्रज्ञान सादर केले. एचएव्हीने स्कॉटलंड, आर्क्टिक किंवा भूमध्य समुद्रावरून पर्यटकांना उड्डाण करण्यासाठी ऑपरेटरसोबत करार केले आहेत, ज्याला ते ‘आकाशातून लक्झरी क्रूझ’ असे वर्णन करतात. या एअरशिप्सचे गोंडोला व्यावसायिक विमानांच्या आतील भागासारखे असतील. परंतु, उड्डाण अधिक सुखद आणि विहंगम असण्याची अपेक्षा आहे.