वॉशिंग्टन : जगातील सुमारे 90 टक्के लोक त्यांच्या आयुष्यात कधी ना कधी ‘एपस्टीन-बार’ या विषाणूने संक्रमित होतात. बहुतेकांसाठी हा विषाणू सौम्य आजार किंवा कोणतीही लक्षणे न दाखवता निघून जातो. मात्र, काही लोकांसाठी हाच विषाणू पुढे जाऊन ‘ल्युपस’, ‘मल्टिपल स्क्लेरोसिस’ यासारखे जुनाट आजार किंवा कर्करोगाचे कारण ठरू शकतो. आता एका नवीन संशोधनात अशा 22 मानवी जनुकांचा शोध लागला आहे, जी या संसर्गाला गंभीर रूप देण्यास कारणीभूत ठरू शकतात.
‘नेचर’ या नियतकालिकात 18 जानेवारी रोजी प्रसिद्ध झालेल्या अभ्यासानुसार, मानवी शरीरातील 22 विशिष्ट जनुके एपस्टीन-बार संसर्गाला जुनाट आजारात बदलण्यासाठी कारणीभूत असू शकतात. कॅलिफोर्निया विद्यापीठातील न्यूरोलॉजीच्या प्राध्यापिका जिल हॉलेनबॅक यांनी सांगितले की, ‘ही जनुके थेट विषाणूला धोकादायक बनवतात की, शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमी करतात, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, या शोधामुळे भविष्यातील संशोधनासाठी एक नवी दिशा मिळाली आहे.’ मोनोन्यूक्लिओसिस या विषाणूमुळे सुरुवातीला प्रचंड थकवा देणारा ‘मोनो’ हा तात्पुरता आजार होऊ शकतो.
आजाराची लक्षणे निघून गेल्यावरही हा विषाणू शरीरातील रोगप्रतिकारक शक्तीच्या ‘बी सेल्स’मध्ये सुप्त अवस्थेत राहतो. काही लोकांमध्ये हा विषाणू अधिक सक्रिय होतो, ज्यामुळे नाकाचा कर्करोग, लिम्फोमा आणि मल्टिपल स्क्लेरोसिस यासारखे ‘ऑटोइम्युन’ विकार उद्भवू शकतात. हृदय आणि फुफ्फुसांच्या आजारांशीही याचा संबंध जोडला गेला आहे. बायलर कॉलेज ऑफ मेडिसीनचे रयान धिंदसा आणि त्यांच्या सहकार्यांनी मानवी ‘डीएनए बायोबँक्स’चा आधार घेऊन हा अभ्यास केला. या बायोबँक्समध्ये लाखो लोकांचा आनुवंशिक डेटा आणि आरोग्य नोंदी असतात. मानवी जनुकांचा अभ्यास करताना शास्त्रज्ञांना त्या पेशींमध्ये लपून बसलेल्या या विषाणूच्या डीएनएचाही मागोवा घेता आला, ज्यातून या 22 जनुकांची ओळख पटली आहे.