लंडन : कंटाळा आला तर तुम्ही काय करता? असं विचारल्यास फिरायला जातो, टाईमपास करतो, आवडीच्या गोष्टींमध्ये मन रमवतो, अशी उत्तरं तुम्ही द्याल. मात्र, एका व्यक्तीने कंटाळा आला म्हणून स्वत:ची 4,670 कोटींची कंपनी विकल्यानंतर आता पुन्हा कामावर रुजू होण्याचा निर्णय घेतल्याचा अजब प्रकार समोर आला आहे.
ज्या व्यक्तीबद्दल आपण बोलतोय त्याचं नाव आहे टॉम ग्रोगन! टॉम हा 35 वर्षांचा असून, त्याने त्याच्या विंगस्टॉप कंपनीचा बहुसंख्या हिस्सा अमेरिकेतील एका खासगी इक्विटी फर्मला तब्बल 400 लाख पौंड म्हणजेच भारतीय चलनानुसार 4,670 कोटींना विकला आहे. कंपनी आर्थिकद़ृष्ट्या उत्तम कामगिरी करत असूनही त्याने हा निर्णय घेतला. लवकर निवृत्ती घ्यायची, अशा विचाराने टॉमने ही ‘रिटायरमेंट’ जाहीर केली होती. मात्र, आता त्याचं मन रमत नसून पुन्हा कामावर रुजू होण्याचा आणि नवीन काहीतरी करण्याचा त्याचा विचार आहे. टॉमने युकेमध्ये विंगस्टॉप ब—ँडची अगदी शून्यातून उभारणी करण्यात जवळजवळ 10 वर्षे खर्च केल्याचं, ‘फॉर्च्यून’च्या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.
टेक्सासमधून पाठवलेल्या एका ई-मेलमधून सुरू केलेल्या कंपनीमध्ये गुंतवणुकीला आधी 50 जणांनी नकार दिलेला. त्यानंतर बरीच मेहनत करून टॉमने 57 रेस्टॉरंटस् असलेली फूड चेन उभी केली. ‘सात वर्षे, तुमचे संपूर्ण मन या व्यवसायात यशस्वी होण्यावर गुंतलेले असते. तुम्ही फक्त त्याच गोष्टीबद्दल आणि आपल्याला कुठे पोहोचायचं आहे याबद्दल विचार करत काम करता. मग जेव्हा तुम्ही तिथे पोहोचता, तेव्हा हे सारे थोडेसे अवास्तव असते. हे असे आहे ते ठीक आहे का? आता हे करून झाले. आता पुढे काय? आणि पैसा देखील ती पोकळी भरून काढत नाही,’ असं टॉम ध्येय साध्य केल्यानंतर येणार्या रितेपणाबद्दल म्हणाला.
बांधकाम कामगार म्हणून 5 पौंड प्रति तास कमाई करणारा टॉम ग्रोगन आता वयाच्या चाळिशी आधीच घेतलेली निवृत्ती मागे घेत कामावर परतण्याची योजना आखत आहे. भविष्यात नेमकं काय करायचं आहे, याची खात्री त्याला नाही. ‘मी जे करेन ते कदाचित अन्न आणि पेयांसंदर्भातील उद्योगातील नसेल,’ असं यशस्वी रेस्टॉरंटस्ची साखळी उभी करणारा टॉम सांगतो. ‘आम्ही आता व्यवसाय उभारणी करत नसून उद्योजक होण्याचं आधीचं ध्येय मागे पडलं असून, पुढे पैशाचे व्यवस्थापन करण्याकडे आमचा कल आहे. या दोन्ही वेगवेगळे सेट ऑफ स्कील्स आहेत. आम्हाला हाताळावी लागणारी आर्थिक साधने, स्टॉक, बाँडस् या सर्व गोष्टी आमच्यासाठी नवीन आहेत; परंतु आम्ही धोरणात्मकद़ृष्ट्या सावधगिरी बाळगत आहोत,’ असं टॉमने सांगितलं.
त्याच्याकडे प्रचंड संपत्ती असूनही, तो ऐश्वर्यसंपन्न आयुष्य जगण्यासाठी, पैसे उधळण्याच्या मताचा नाही. तो हा पैसा स्वत:च्या ऐश्वर्यसंपन्न आयुष्यासाठी खर्च करत नाही. निवृत्तीनंतरच्या आयुष्याबद्दल बोलताना टॉमने, ‘हे कंटाळवाणे आहे. मी समुद्रकिनार्यावर बसून जीवन जगू शकत नाही. मला वाटते की आपल्याला आपल्या मनावर ताबा ठेवण्यासाठी, स्वतःला आव्हान देण्यासाठी काहीतरी हवे आहे. जागे होण्यासाठी दररोज एक उद्देश हवा आहे, जो आपल्याकडे सध्या नाही,’ असं म्हणत निवृत्ती मागे घेण्याचे संकेत दिलेत.