ट्रिसेनबर्ग : घर, गाडी, एसी किंवा फ्रिज भाड्याने घेणे खूप सामान्य आहे; पण एकवेळ अशीही होती, ज्यावेळी एक देश चक्क भाड्याने मिळत होता. ही पद्धत 2011 मध्ये बंद केली गेली आहे; पण तोवर देश भाड्याने घेणे शक्य होत होते. आता त्यावेळी एका रात्रीचे भाडे किती आकारले जात होते, याचा आकडा ऐकून धक्का बसेल; पण हेही लक्षात घ्यायला हवे की इथे आपण जमिनीच्या एका छोट्या तुकड्याबद्दल बोलत नाही आहोत, तर संपूर्ण देश भाड्याने देण्याबद्दल बोलत आहोत.
या देशाचे नाव आहे लिकटेनस्टाईन. हा युरोपमधील एक छोटासा देश आहे, जो स्वित्झर्लंड आणि ऑस्ट्रियाच्या मध्ये आहे. आकारमान, एकूण क्षेत्रफळ पाहिले, तर हा देश अगदी दिल्ली-मुंबईपेक्षाही लहान आहे. हा एक अतिशय श्रीमंत देश आहे आणि त्याची लोकसंख्या 40 आहे. आता हा देश किती रुपयांना भाड्याने मिळत होता, त्याची उत्सुकता असेल. हा देश त्यावेळी 70 हजार डॉलर्स (60 लाख रुपये) मध्ये भाड्याने मिळत होता. हा देश एअर बीएनबीवर नोंदणीकृत होता. एका मार्केटिंग आणि प्रोडक्शन कंपनीने मिळून हा भाड्याचा व्यवसाय सुरू केला होता.
एका इन्स्टाग्राम अकाऊंटवरून या देशाबद्दलची माहिती व्हिडीओद्वारे देण्यात आली आहे. व्हिडीओमध्ये सांगितले आहे की, जेव्हा कोणी बुकिंग करत असे, तेव्हा त्याच्या कार्यक्रमाचे तपशील रस्त्याच्या कडेला असलेल्या फलकांवर आणि इतर ठिकाणी लिहिले जात होते. लोकांना किल्ल्यांमध्ये मोफत प्रवेश होता आणि खुद्द राजा येऊन चाव्या सोपवत असे. पाहुणेही या खासगी कार्यक्रमात येऊ शकत होते आणि आल्प्स पर्वतावर आतषबाजी होत असे. 2011 पासून तो भाड्याने देणे बंद करण्यात आले, अशी माहितीही लोकांनी व्हिडीओवर दिली आहे.