1000 year old gold coin | इंग्लंडमध्ये सापडले एक हजार वर्षांपूर्वीचे सोन्याचे नाणे 
विश्वसंचार

1000 year old gold coin | इंग्लंडमध्ये सापडले एक हजार वर्षांपूर्वीचे सोन्याचे नाणे

पुढारी वृत्तसेवा

नॉरफोक (इंग्लंड): इंग्लंडच्या पूर्व किनारपट्टीवरील नॉरफोक येथे एका मेटल डिटेक्टॉरच्या साहाय्याने 1000 वर्षांपूर्वीचे एक दुर्मीळ सोन्याचे नाणे शोधण्यात आले आहे. हे नाणे इसवी सन 865 मध्ये इंग्लंडवर आक्रमण करणार्‍या ‘ग्रेट हिदन आर्मी’च्या खुणांपैकी एक असल्याचे मानले जात आहे. या आक्रमणामुळेच इंग्लंडमध्ये ‘डेनलाव्ह’ नावाचे व्हायकिंग साम्राज्य स्थापन झाले होते.

बि—टिश म्युझियमच्या ‘पोर्टेबल अँटिक्विटी स्किम’नुसार, हे नाणे 2024 मध्ये एलसिंग गावाजवळील एका शेतात सापडले. विशेष म्हणजे, या नाण्याला दोन छिद्रे पाडण्यात आली होती, जेणेकरून ते गळ्यात पदक म्हणून घालता येईल. नाणेतज्ज्ञ सायमन कूपलँड यांच्या मते, हे नाणे एखाद्या व्हायकिंग आक्रमकाच्या मालकीचे असावे, ज्याने ते संरक्षणासाठी ‘ताईत’ म्हणून वापरले होते. हे नाणे मूळ नसून एका प्रसिद्ध नाण्याची नक्कल आहे: मूळ नाणे: हे नाणे शार्लमेनचा मुलगा आणि कॅरोलिंगियन सम्राट ‘लुई द पायस’ याने 50 वर्षांपूर्वी पाडलेल्या ‘सॉलिडस’ नाण्याची सोन्याची प्रतिकृती आहे. वापर: मूळ सोन्याची नाणी उच्चपदस्थ सरदारांना दिली जात असत. मात्र, ही नक्कल कदाचित सध्याच्या नेदरलँड किंवा जर्मनीच्या भागात तयार करण्यात आली असावी आणि स्कॅन्डिनेव्हियामध्ये ती ‘फिरती संपत्ती’ म्हणून वापरली जात असे. या नाण्याच्या एका बाजूला सम्राट लुईची प्रतिमा आहे, जी पदक म्हणून घालताना समोरच्या बाजूला दिसेल अशा बेताने छिद्रे पाडलेली आहेत. नाण्याच्या दुसर्‍या बाजूला ख्रिश्चन क्रॉसचे चिन्ह आहे. 865 मध्ये डॅनिश सरदार ‘आयव्हर द बोनलेस’, ‘हाल्फदान’ आणि ‘उब्बा’ यांच्या नेतृत्वाखाली व्हायकिंग सैन्याने इंग्लंडवर आक्रमण केले होते. हे तिन्ही सरदार प्रख्यात व्हायकिंग नायक ‘रागनर लोथब—ोक’ याचे पुत्र असल्याचा दावा केला जातो. सध्या हे नाणे अधिकृत तपासातून जात असून, ते ‘खजिना’ म्हणून घोषित झाल्यास नॉरविच कॅसल म्युझियममध्ये जतन केले जाण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT