बंगळूर : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) चंद्राच्या पृष्ठभागाबाबत एक अत्यंत महत्त्वाची माहिती जगासमोर आणली आहे. ‘चंद्रयान-3’ मोहिमेतील ‘विक्रम’ लँडरवर बसवलेल्या RAMBHA-LP या विशेष उपकरणाने चंद्राच्या दक्षिण धुवाजवळ पृष्ठभागालगत प्रचंड ऊर्जेने भरलेल्या ‘प्लाझ्मा’ची उपस्थिती नोंदवली आहे. इतक्या कमी उंचीवर चंद्राच्या प्लाझ्मा वातावरणाचा थेट अभ्यास करण्याची ही जगातील पहिलीच वेळ आहे.
23 ऑगस्ट 2023 ते 3 सप्टेंबर 2023 या कालावधीत विक्रम लँडरने गोळा केलेल्या आकडेवारीच्या विश्लेषणानुसार, चंद्राच्या पृष्ठभागाजवळील विद्युत वातावरण पूर्वीच्या अंदाजापेक्षा कितीतरी पटीने अधिक सक्रिय आहे. RAMBHA-LP उपकरणाचा मुख्य उद्देश चंद्राच्या पृष्ठभागाजवळील आयन आणि इलेक्ट्रॉनच्या (प्लाझ्मा) प्रमाणात होणारे बदल मोजणे हा होता. या अभ्यासामुळे दक्षिण धुवीय अक्षांशांवर प्लाझ्माची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे स्पष्ट झाले आहे.
‘शिवशक्ती पॉईंट’जवळील आकडेवारी
‘इस्रो’ने दिलेल्या माहितीनुसार, ‘चंद्रयान-3’ जिथे उतरले त्या ‘शिवशक्ती पॉईंट’जवळ इलेक्ट्रॉनची घनता प्रतिघन सेंटिमीटर 380 ते 600 इतकी आढळली आहे. हा आकडा आधीच्या अंदाजापेक्षा खूप जास्त आहे. तसेच, येथील इलेक्ट्रॉन्सचे तापमान 3,000 ते 8,000 केल्विन इतके नोंदवण्यात आले आहे, जे चंद्राच्या वातावरणातील सतत होणारे बदल दर्शवते.
भविष्यातील मोहिमांसाठी महत्त्व
‘इस्रो’च्या शास्त्रज्ञांनुसार, चंद्राचे प्लाझ्मा वातावरण त्याच्या कक्षेनुसार बदलत असते. जेव्हा चंद्र पृथ्वीच्या चुंबकीय शेपटीतून (Magnetic Tail) जातो, तेव्हा पृथ्वीकडून येणारे प्रभारित कण या वातावरणात बदल घडवून आणतात. या शोधामुळे भविष्यात चंद्रावर पाठवल्या जाणाऱ्या मानवी आणि रोबोटिक मोहिमांचे नियोजन करणे अधिक सोपे होणार आहे.