वॉशिंग्टन : एकेकाळी जगातील सर्वात मोठा हिमनग म्हणून ओळखल्या जाणार्या ‘A23a’ ( A23 a) चा आता अंत जवळ आला आहे. नासाच्या नवीन उपग्रह फोटोंमधून असे दिसून आले आहे की, हा महाकाय हिमनग आता वितळून निळ्या रंगाच्या एका विरघळलेल्या ढिगार्यात रूपांतरित होत आहे. न्यूयॉर्क शहराच्या तिप्पट आकार असलेला हा हिमनग आपल्या 40 व्या वाढदिवसाच्या उंबरठ्यावर असताना विरघळू लागला आहे.
‘A23 a’ हा हिमनग सामान्य हिमनगांपेक्षा वेगळा ठरला आहे. याच्या प्रवासाचे मुख्य टप्पे खालीलप्रमाणे आहेत. 1986 मध्ये हा अंटार्क्टिकाच्या ‘फिल्चनर-रोन’ बर्फाच्या थरापासून वेगळा झाला. वेगळा झाल्यानंतर लगेचच याचा खालचा भाग समुद्राच्या तळाला अडकला, ज्यामुळे तो तब्बल 34 वर्षे एकाच ठिकाणी स्थिर होता. 2020 मध्ये हा हिमनग समुद्राच्या तळापासून मुक्त झाला आणि अंटार्क्टिकापासून दूर वाहू लागला. 2024 मध्ये हा हिमनग एका मोठ्या समुद्री प्रवाहात अडकून गोल फिरत होता. त्यानंतर तो दक्षिण जॉर्जिया बेटाच्या दिशेने झेपावला, ज्यामुळे तेथील पेंग्विनच्या अधिवासाला धोका निर्माण होईल, अशी भीती शास्त्रज्ञांना वाटत होती.
मात्र, मे 2025 मध्ये बेटावर पोहोचण्यापूर्वीच त्याचे तुकडे होऊ लागल्याने हे संकट टळले. आता हा हिमनग दक्षिण अटलांटिक महासागरातील उबदार पाण्यात पोहोचला असून, तेथे तो झपाट्याने वितळत आहे. नासाच्या ‘टेरा’ ((Terra) उपग्रहाने 26 डिसेंबर रोजी घेतलेले फोटो या हिमनगाचे भीषण रूप दाखवतात. हिमनग आता त्याच्या मूळ आकाराच्या केवळ एक तृतीयांश उरला आहे. हिमनगाच्या पृष्ठभागावर निळ्या रंगाची पाण्याची डबकी तयार झाली आहेत. पाण्याचा भार बर्फाच्या भेगांमध्ये पडल्यामुळे या भेगा अधिक रुंद होत आहेत.
हिमनगाच्या कडेला करड्या रंगाचा ‘बर्फाचा चिखल’ पसरलेला दिसत आहे, जो हिमनगातून बाहेर पडत आहे. मुख्य हिमनगापासून वेगळे झालेले शेकडो छोटे हिमनग त्याच्या अवतीभवती विखुरलेले आहेत.‘हिमनगावरील निळसर भाग हा वितळलेल्या तलावांचा आहे. बर्फाची रचना कमकुवत झाल्यामुळे हे तलाव तयार होतात आणि पाण्याचा दाब बर्फाला अधिक फाडत जातो,’ असे कोलोराडो बोल्डर विद्यापीठाचे हवामान शास्त्रज्ञ टेड स्कॅम्बोस यांनी सांगितले. एकेकाळी ‘हिमनगांची राणी’ म्हणून ओळखल्या जाणार्या या अजस्त्र हिमाच्छादित बेटाचा प्रवास आता लवकरच संपणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.