IPhone Gift to Employees | कर्मचाऱ्यांना गिफ्ट म्हणून दिला चक्क आयफोन! 
विश्वसंचार

IPhone Gift to Employees | कर्मचाऱ्यांना गिफ्ट म्हणून दिला चक्क आयफोन!

पुढारी वृत्तसेवा

दुबई : कल्पना करा… तुम्ही ऑफिसला जाता आणि तुमचा बॉस तुम्हाला एका मीटिंग रूममध्ये बोलावतो; पण ही मीटिंग एखाद्या टार्गेट किंवा प्रोजेक्टबद्दल नसून, तुम्ही खूश व्हाल असं सरप्राईज असते. हे कदाचित खरं वाटणार नाही; पण युएईमधील एका कंपनीच्या कर्मचाऱ्यांसोबत नेमकं हेच घडलं. बॉसने आधी संपूर्ण टीमला मीटिंग रूममध्ये बोलावले आणि मग त्यांना एकामागून एक आयफोन भेट म्हणून दिले. बॉसने दिलेल्या या सरप्राईजचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्ही म्हणाल, ‘असं आमच्यासोबतही घडायला हवं होतं!’ युएईमधील कंपनीच्या व्हायरल व्हिडीओमध्ये व्यवस्थापन कर्मचाऱ्यांसमोर गिफ्ट पॅकेटस् ठेवताना दिसत आहे, ज्यात काहींमध्ये आयफोन आहेत तर काहींमध्ये फक्त चॉकलेट्स आहेत. काहींना आयफोन मिळतात, तर काहींना फक्त चॉकलेटस् मिळतात; पण या सरप्राईज गिफ्टमधील आणखी एक आश्चर्याची गोष्ट म्हणजे, ज्यांना चॉकलेटस् मिळाली आहेत त्यांनाही कंपनी आयफोन देते. एका वृत्तानुसार, हा व्हिडीओ युएई-स्थित कंपनी ‘वर्ल्ड स्टार मॅनपॉवर’चे संस्थापक निशाद हुसेन आणि त्यांच्या पत्नी हसिना निशाद यांनी शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये एका टेबलावर अनेक भेटवस्तू ठेवलेल्या दिसतात आणि सर्व कर्मचारी प्रत्येकी एक भेटवस्तू निवडतात. काहींना आयफोन मिळतात, तर इतरांना चॉकलेट मिळतात.

मग, थोड्या वेळाने हसिना निशाद प्रवेश करतात आणि ज्यांना फक्त चॉकलेट मिळाले होते त्यांना आयफोन भेट देतात. यामुळे ज्या कर्मचाऱ्यांना चॉकलेटसुद्धा मिळाले होते, त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलते. व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये हसिना निशाद म्हणतात, ‘व्यवस्थापकीय संचालक म्हणून, माझा विश्वास आहे की खरे यश हे आपल्या लोकांच्या समर्पणातून, सकारात्मक वृत्तीतून आणि सामूहिक शक्तीतून येते! प्रत्येक प्रयत्न, प्रत्येक कल्पना आणि प्रत्येक योगदान आपल्याला पुढे नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावते! मी तुम्हा प्रत्येकाला तुमच्या क्षमतेवर विश्वास ठेवण्यासाठी, प्रगतीच्या प्रत्येक संधीचा स्वीकार करण्यासाठी आणि एकमेकांना पाठिंबा देत राहण्यासाठी प्रोत्साहित करते! चला, आपण आपले मापदंड उंचावत राहूया, आत्मविश्वासाने आव्हानांना सामोरे जाऊया आणि मोठ्या यशासाठी एकत्र प्रयत्न करूया! आमची ताकद आमचे लोक आहेत आणि आमच्या शक्यता अमर्याद आहेत!’

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT