नॅशव्हिल : ओहायोमधील एका दाम्पत्याच्या घरी गेल्या आठवड्यात एका गोंडस मुलाचा जन्म झाला; पण ही केवळ एक सामान्य घटना नाही, तर वैद्यकीय इतिहासातील एक चमत्कार आहे. या बाळाचा विकास तब्बल 30 वर्षांहून अधिक काळ गोठवून ठेवलेल्या भ्रूणातून (एम्ब्रियो) झाला आहे. जन्मापूर्वी इतका काळ भ्रूण गोठवून ठेवण्याचा हा एक नवीन जागतिक विक्रम मानला जात आहे. लिंडसे आणि टिम पिअर्स या दाम्पत्याने अनेक वर्षे अपत्यप्राप्तीसाठी प्रयत्न केल्यानंतर ‘एम्ब्रियो अॅडॉप्शन’चा मार्ग निवडला. त्यांनी 1994 पासून गोठवून ठेवलेले काही दान केलेले भ्रूण वापरण्याचा निर्णय घेतला. शनिवारी जन्मलेला त्यांचा मुलगा, थॅडियस, तब्बल 11,148 दिवस स्टोरेजमध्ये असलेल्या भ्रूणातून विकसित झाला आहे. पिअर्स दाम्पत्याच्या डॉक्टरांनी हा एक विक्रम असल्याचे म्हटले आहे. ‘एम्ब्रियो अडॉप्शन’ची ही संकल्पना 1990 च्या दशकापासून अस्तित्वात आहे. परंतु, आता ती अधिक चर्चेत येत आहे. अनेक फर्टिलिटी क्लिनिक्स आणि ख्रिश्चन संस्था ‘आयव्हीएफ’ प्रक्रियेनंतर शिल्लक राहिलेले भ्रूण नष्ट करण्याच्या विरोधात आहेत. त्यांच्या मते, गर्भधारणेच्या वेळीच जीवनाची सुरुवात होते आणि प्रत्येक भ्रूणाला एका घराची गरज असलेल्या मुलाप्रमाणे वागणूक मिळायला हवी. अमेरिकेत सध्या अंदाजे 15 लाख गोठवलेले भ्रूण स्टोरेजमध्ये आहेत आणि त्यांच्या पालकांना त्यांचे काय करायचे, याची चिंता आहे.
‘एम्ब्रियो अॅडॉप्शन’ची ही प्रक्रिया अत्यंत गुंतागुंतीची होती. जुनी कागदपत्रे शोधून भ्रूणांना ओरेगॉनमधून टेनेसीमधील डॉ. जॉन डेव्हिड गॉर्डन यांच्या क्लिनिकमध्ये पाठवण्यात आले. लिंडा यांनी दान केलेल्या तीन भ्रूणांपैकी एक वितळवण्याच्या प्रक्रियेत टिकू शकला नाही. दोन भ्रूण लिंडसे यांच्या गर्भाशयात हस्तांतरित करण्यात आले, त्यापैकी एकाचे यशस्वीपणे रोपण झाले. डॉ. गॉर्डन यांच्या मते, जवळपास 31 वर्षे जुन्या भ्रूणातून बाळाचा जन्म होणे हा एक विक्रम आहे. योगायोगाने, याआधीचा 30 वर्षांचा विक्रमही त्यांच्याच क्लिनिकने केला होता. डॉ. गॉर्डन म्हणतात, ‘एम्ब्रियो अॅडॉप्शन’च्या प्रक्रियेतून बाळाचा जन्म झाला हे जरी सुखावह वाटत असले, तरी हे भ्रूण इतकी वर्षे स्टोरेजमध्ये का पडून आहेत? ही समस्या का निर्माण झाली आहे? याचा विचारही करण्याची वेळ आली आहे. दुसरीकडे आपत्यप्राप्तीचा आनंद मिळालेल्या पिअर्स दाम्पत्याने म्हटले आहे, आम्ही विक्रम करण्यासाठी हे केले नाही. आम्हाला फक्त एक बाळ हवं होतं, ते मिळाले आहे. आम्ही आनंदी आहोत.
या भ्रूणांना दान करणार्या 62 वर्षीय लिंडा आर्चरड यांनी सांगितले की, 1994 मध्ये त्यांनी ‘आयव्हीएफ’चा पर्याय निवडला होता. त्यावेळी त्यांच्याकडे चार भ्रूण तयार झाले होते. एका मुलीच्या जन्मानंतर त्यांचा घटस्फोट झाला, ज्यामुळे आणखी मुले जन्माला घालण्याची त्यांची योजना थांबली. अनेक वर्षे आणि नंतर दशके उलटून गेली, तरीही त्या भ्रूणांचे काय करावे, याची चिंता होती. या तीन लहान भ्रूणांना माझ्या मुलीप्रमाणेच जगण्याचा हक्क आहे, मला नेहमी वाटायचे. अखेरीस, मी ‘स्नोफ्लेक्स’ या संस्थेमार्फत आपले भ्रूण पिअर्स दाम्पत्याला दत्तक देण्याचा निर्णय घेतला.