वॉशिंग्टन : एलन मस्क यांची आर्टिफिशिअल इंटेलिजन्स कंपनी ‘xAI’ पुन्हा एकदा मोठ्या वादात सापडली आहे. कंपनीचा ‘एआय’ चॅटबॉट ‘ग्रोक’ (Grok) लोकांच्या परवानगीशिवाय त्यांच्या खासगी आणि संवेदनशील फोटोंचा वापर करून अत्यंत आक्षेपार्ह साहित्य (कंटेंट) तयार करत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. हे प्रकरण आता केवळ सोशल मीडियावरील चर्चेपुरते मर्यादित न राहता थेट न्यायालयाच्या दारापर्यंत पोहोचले आहे. अमेरिकेतील एका फेडरल कोर्टात दाखल झालेल्या खटल्यामुळे ‘एआय’ टूलची सुरक्षितता, कंटेंट मॉडरेशन आणि नैतिकतेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
कॅलिफोर्नियातील फेडरल कोर्टात xAI विरोधात हा गंभीर कायदेशीर खटला दाखल करण्यात आला आहे. बालपणी लैंगिक शोषणाची शिकार ठरलेल्या एका महिलेने आरोप केला आहे की, xAI च्या ग्रोक चॅटबॉटने तिच्या जुन्या फोटोंचा वापर करून नवीन आक्षेपार्ह साहित्य तयार केले आहे. तक्रारीत म्हटले आहे की, xAI ने ग्रोकची रचना अशाप्रकारे केली आहे, जेणेकरून तो खऱ्या आणि ओळखता येण्याजोग्या व्यक्तींच्या फोटोंवरून आक्षेपार्ह कंटेंट तयार करून तो सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ (पूर्वीचे ट्विटर) वर प्रसिद्ध करू शकेल.
या पीडित महिलेची ओळख २००० च्या दशकाच्या सुरुवातीला अमेरिकेच्या ‘नॅशनल सेंटर फॉर मिसिंग अँड एक्सप्लॉईटेड चिल्ड्रेन’द्वारे पटवण्यात आली होती. तिच्या शोषणाचे फोटो गेल्या दोन दशकांपासून इंटरनेटवर उपलब्ध आहेत. याच जुन्या फोटोंचा गैरवापर करून ग्रोकने तिचे नवीन अश्लील फोटो तयार केले, ज्याची ओळख ‘कॅनेडियन सेंटर फॉर चाईल्ड प्रोटेक्शन’ने पटवली आहे. या याचिकेत ग्रोकच्या ‘इमेज-जनरेशन’ फीचरशी संबंधित एका जुन्या वादाचाही उल्लेख करण्यात आला आहे. अहवालानुसार, हा वाद तेव्हा सुरू झाला जेव्हा मस्क यांनी स्वतः ग्रोकला स्वतःचाच बिकिनी घातलेला एक फोटो तयार करण्यास सांगितले होते.
‘सेंटर फॉर काऊंटरिंग डिजिटल हेट’च्या संशोधकांचा हवाला देत या खटल्यात दावा करण्यात आला आहे की, ग्रोकने अवघ्या ११ दिवसांत ३० लाखांहून अधिक आक्षेपार्ह फोटो तयार केले; ज्यामध्ये २३,००० हून अधिक फोटो लहान मुलांशी संबंधित असल्याचे दिसून येते. धक्कादायक बाब म्हणजे, xAI ने हे धोकादायक फीचर पूर्णपणे बंद करण्याऐवजी फक्त पैसे देऊन सेवा वापरणाऱ्या ‘पेड सबस्क्रायबर्स’पुरते मर्यादित केले. ग्रोकद्वारे तयार केलेल्या या कथित आक्षेपार्ह सामग्रीबाबत xAI वर दाखल झालेला हा दुसरा कायदेशीर खटला आहे.
यापूर्वी टेनेसी येथील तीन तरुणांनी दाखल केलेल्या एका वेगळ्या खटल्याची व्याप्ती वाढवून त्यात आता नवीन वादी आणि ‘स्टॅबिलिटी AI’लादेखील समाविष्ट करण्यात आले आहे. या प्रकरणातील पीडित महिलेने अमेरिकेच्या ‘माशा कायद्यानुसार’ (Masha’s Law) भरपाईची मागणी केली आहे. हा अमेरिकन कायदा बाल शोषणाच्या बळी ठरलेल्या व्यक्तींना प्रत्येक उल्लंघनासाठी किमान १,५०,००० डॉलर्स (सुमारे १ कोटी २५ लाख रुपये) च्या दाव्याची परवानगी देतो. यासोबतच, तिने xAI कडे असलेली सर्व बेकायदेशीर सामग्री नष्ट करण्याचे आदेश कोर्टाने द्यावेत, अशी मागणी केली असून ज्युरी ट्रायलची मागणी केली आहे.