न्यूयॉर्क ः टेस्ला आणि स्पेसएक्सचे सर्वेसर्वा एलन मस्क लवकरच इतिहासातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून ‘ट्रिलिनेअर’ क्लबमध्ये प्रवेश करणार आहेत. फेबुवारी 2026 पर्यंत 800 अब्ज डॉलर्सचा टप्पा ओलांडणारे ते पहिले व्यक्ती ठरले असून, सध्या त्यांची एकूण संपत्ती 850 अब्ज डॉलर्सवर पोहोचली आहे.
मस्क यांची एकट्याची संपत्ती जगातील इतर तीन बड्या श्रीमंतांच्या एकूण संपत्तीपेक्षाही जास्त आहे. हे तीन उद्योगपती असे ः लॅरी पेज (गूगल सह-संस्थापक) : 251 अब्ज डॉलर्स, सर्गेई बिन (गूगल सह-संस्थापक) : 231 अब्ज डॉलर्स, मार्क झुकेरबर्ग (मेटा सीईओ) : 219 अब्ज डॉलर्स. मस्क यांच्या संपत्तीत झालेल्या या अफाट वाढीमागे त्यांच्या कंपन्यांमधील अलीकडील व्यवहार कारणीभूत आहेत. मस्क यांची एरोस्पेस कंपनी ‘स्पेस एक्स’ने त्यांचीच आर्टिफिशियल इंटेलिजन्स कंपनी ‘एक्स एआय’ विकत घेतली आहे. या एकत्रित कंपनीचे मूल्य 1.25 ट्रिलियन डॉलर्स इतके आहे. या नवीन कंपनीत मस्क यांची 43 टक्के भागीदारी असून, त्यांच्या एकट्या हिश्श्याची किंमत 530 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त आहे. म्हणजेच, त्यांच्या एकूण संपत्तीचा दोन तृतीयांश हिस्सा आता स्पेसएक्समधून येतो. न्यूयॉर्कमधील ‘कालशी’ या प्रेडिक्शन मार्केट प्लॅटफॉर्मनुसार : मस्क हे याचवर्षी ट्रिलिनेअर बनण्याची शक्यता 75 टक्के आहे. 91 टक्के ट्रेडर्सना वाटते की, 2029 पूर्वी ते हा टप्पा गाठतील. 86 टक्के लोकांच्या मते हे पुढील वर्षातच शक्य होईल. मस्क यांच्या संपत्तीत टेस्लाचा वाटा अजूनही मोठा आहे. टेस्लामध्ये त्यांची 12 टक्के भागीदारी असून, त्याची किंमत 178 अब्ज डॉलर्स आहे. याशिवाय, त्यांच्याकडे 124 अब्ज डॉलर्सचे स्टॉक ऑप्शन्स आहेत. विशेष म्हणजे, नोव्हेंबरमध्ये मंजूर झालेल्या विक्रमी ‘पे-पॅकेज’चा यात समावेश नाही; तो समाविष्ट झाल्यास मस्क यांना अतिरिक्त 1 ट्रिलियन डॉलर्सचे शेअर्स मिळू शकतात.